भारतामधील क्रीडा विकासाचा ध्यास विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने घेतला आहे. आपल्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
सचिन याने ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राच्या इंग्लंडमधील विक्रीला लंडनमधील एका समारंभाद्वारे प्रारंभ झाला. त्यावेळी तो म्हणाला, ‘‘मी जरी राज्यसभेचा सदस्य असलो तरी राजकारणात सक्रिय होण्याचा माझा विचार नाही. मात्र मी एक खेळाडू या नात्याने देशात खेळाचा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. या संदर्भात मी यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मी त्यांच्याकडे योजनांचा तपशील सादर केला आहे. मोदी यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीने या योजनांबाबत माझ्याशी चर्चाही केली आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशीही मी चर्चा केली आहे. या संदर्भात लवकरच त्याची घोषणा केली जाईल.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘भविष्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी सध्यासंघातील खेळाडूंना सल्ले देत असतो. माझ्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हावा हीच माझी
इच्छा आहे.’’
दौरा अर्धवट सोडण्याचा विंडीजचा निर्णय अयोग्य
मानधनावरून स्वत:च्या क्रिकेट मंडळाशी झालेल्या मतभेदाचा निषेध करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी भारताचा दौरा अर्धवट सोडला ही त्यांची कृती क्रिकेटला अयोग्य आहे. मात्र मी याबाबत सविस्तर बोलणे उपयोगी ठरणार नाही, असे सचिनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर या खेळाशी माझा फारसा संबंध राहिलेला नाही. वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांवरच पाहूनच मला क्रिकेटमधील अद्ययावत माहिती मिळाली. नेमक्या कोणत्या कारणास्तव त्यांनी हा घाईघाईने निर्णय घेतला हे मला कळू शकलेले नाही.