वेस्ट इंडिजने पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत सव्याज परतफेड करत मालिकेत बरोबरी साधली. आता तिसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट असले तरी हा सामना जिंकून १९८८नंतर इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यासाठी पाहुणा विंडीज संघ सज्ज झाला आहे.

ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वेस्ट इंडिजने साऊदम्प्टन येथील पहिली कसोटी जिंकली होती. त्यानंतर बेन स्टोक्सच्या अप्रतिम कामगिरीमुळे इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकत पुनरागमन केले होते.

पहिल्या कसोटीत इंग्लंडची फलंदाजी कोलमडली होती, पण दुसऱ्या कसोटीत त्यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. जोस बटलर बहरात नसल्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्यता आहे.

प्जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांच्या सध्याच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स हे त्यांना विश्रांती देण्याच्या विचारात नाहीत.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स