वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या दौऱयाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन’ने (एफआयसीए) सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला. पाकिस्तानचा दौरा करणे म्हणजे खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असे निरीक्षण ‘एफआयसीए’ने नोंदवले. पाहुण्या संघाच्या सुरक्षेची कितीही हमी पाकिस्तानकडून देण्यात आली तरी त्यास मंजूर देता येणे कठीण आहे, असेही एफआयसीएने म्हटले आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात फ्लोरिडा येथे दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौऱयासाठी सुरक्षेची माहिती मिळविण्यासंदर्भात सल्ला देण्यासाठीचे पत्र एफआयसीएला लिहीले होते. यात एफआयसीएने वेस्ट इंडिजला ‘इस्टर्न स्टार इंटरनॅशनल’ या सुरक्षा यंत्रणेची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. इस्टर्न स्टार इंटरनॅशनल ही सुरक्षा यंत्रणा सध्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांना तसेच आयसीसीला सुरक्षा पुरवते.

VIDEO: पीटरसनने पोलार्डच्या गोलंदाजीवर खेळण्यास नकार दिला!

 

क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमध्ये अजूनही फ्लोरिडातील ट्वेन्टी-२० सामन्यांच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. हे दोन्ही क्रिकेट सामने मार्च १९ आणि २० तारखेला होण्याची शक्यता आहे. मार्च आणि मे या महिन्यात दोन संघांमध्ये दोन ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळलेल्या वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू आंद्रे रसेल याने पाकिस्तानात खेळण्याची तयारी दाखवली होती. याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डेरेन सॅमी यानेही पाकिस्तानचा दौरा करायला आवडेल असे म्हटले होते.
२००९ साली पाकिस्तान दौऱयावर गेलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा पाकिस्तानात आजवर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलेले नाही.

वाचा: पाकिस्तानला धोबीपछाड, कसोटीत पुन्हा भारतच ‘किंग’…