वेस्ट इंडिज आज पाकिस्तानशी भिडणार

नॉटिंगहॅम : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ म्हणजे अनपेक्षित कामगिरीसाठी ओळखले जातात. कोणत्याही क्षणी मातब्बर संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता बाळगून असलेले हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या १० सामन्यांत पराभूत झालेल्या पाकिस्तानसाठी दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये जिंकलेला चॅम्पियन्स करंडक हेच एकमेव प्रेरणादायी आहे, तर यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा विंडीज संघ पाकिस्तानला पहिलाच हादरा देण्यासाठी उत्सुक आहे.

वेगवेगळ्या लयीत असलेले दोन्ही संघ नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पहिल्यावहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ५-०ने तर इंग्लंडविरुद्ध ४-० असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यातच अफगाणिस्ताविरुद्धच्या सराव सामन्यातही पाकिस्तानला विजयाचे खाते खोलता आले नाही. पण विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळताना पाकिस्तानचे खेळाडू झोकून कामगिरी करतात, हे आजवरचे चित्र. त्यामुळे सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ २०१७च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ४२१ धावांची बरसात केली होती. नॉटिंगहॅमची खेळपट्टीही फलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे वेस्ट इंडिजच्या नावासमोर पुन्हा एकदा ४०० धावा लागण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजने अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देत समतोल संघ निवडला आहे.

मोहम्मद आमिरचा धोका

निकालनिश्चिती प्रकरणामुळे बंदीची शिक्षा भोगलेल्या मोहम्मद आमिरने पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे गोलंदाजीत पाकिस्तानचा संघ आमिरच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मात्र चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन बळी मिळवत आमिरने पाकिस्तानला विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र त्यानंतर आमिरला १५ सामन्यांत फक्त पाच बळी मिळवता आले आहेत.

शाय होप लयीत

सराव सामन्यात ख्रिस गेलचा झंझावात पाहायला मिळाला नसला तरी शाय होपने मात्र खणखणीत शतक झळकावत आपणही आक्रमक लयीत असल्याचे दाखवून दिले. इतकेच नव्हे तर गेल्या पाच सामन्यांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावत विंडीजच्या विजयात योगदान दिले आहे. एविन लुइस, आंद्रे रसेल आणि जेसन होल्डर यांनी सराव सामन्यात चांगली फलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजची फलंदाजी तगडी वाटत आहे.

विंडीजला गोलंदाजीची चिंता

रसेल आणि ब्रेथवेट या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना अंतिम संघात स्थान देण्यात आले तर वेस्ट इंडिजसमोर गोलंदाजीत मोजकेच पर्याय उपलब्ध असतील. केमार रोच आणि श्ॉनन गॅब्रियन यांच्यावर वेगवान गोलंदाजाची धुरा सोपवली आणि फिरकीपटू अ‍ॅशले नर्सला संधी दिली तर वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस याला संघाबाहेर बसावे लागेल. त्यामुळे फलंदाजीतील ताकद वाढवायची की एखाद्या विशेषज्ञ गोलंदाजाला संधी द्यायची, हा पेचप्रसंग संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागेल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहसा सामने बरोबरीत सुटत नाहीत. पण वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील तब्बल तीन सामने ‘टाय’ झाले आहेत.

निकालनिश्चितीनंतर बंदीमुळे २०११ आणि २०१५च्या विश्वचषकाला मुकलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आपल्या दशकभराच्या कारकीर्दीनंतरही पहिल्यांदाच विश्वचषकात खेळत आहे.

सामना क्र. २

वेस्ट इंडिज वि. पाकिस्तान

* स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, स्टार प्रवाह मराठी.

संघ

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, इव्हिन लेविस, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, कालरेस ब्रॅथवेट, फॅबिअन अ‍ॅलन, अ‍ॅश्ले नर्स, श्ॉनन गॅब्रिएल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमार रोच.

पाकिस्तान : सर्फराझ अहमद (कर्णधार व यष्टिरक्षक), इमाम-उल-हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हसनैन.

बोलंदाजी

संघातील वरिष्ठ खेळाडू या नात्याने सहकाऱ्यांना व कर्णधाराला वेळोवेळी मार्गदर्शन करणे माझे कर्तव्य आहे. कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक गाजवण्यासाठी मी उत्सुक आहे.

– ख्रिस गेल,  वेस्ट इंडिजचा फलंदाज

गोलंदाजी हीच आमची ताकद असून यापूर्वीही आम्ही इंग्लंडमध्ये गोलंदाजांच्या बळावर विजय मिळवले आहेत. त्यामुळे यावेळीही अन्य संघांनी आमच्या गोलंदाजांपासून सावध रहावे.

– सर्फराझ अहमद, पाकिस्तानचा कर्णधार

आमनेसामने

एकदिवसीय :

सामने : १३३, वेस्ट इंडिज : ७०, पाकिस्तान : ६०, टाय / रद्द : ३

विश्वचषकात   

सामने : १०, वेस्ट इंडिज : ७, पाकिस्तान : ३, टाय / रद्द : ०

खेळपट्टीचा अंदाज

जवळपास १८ हजारांची प्रेक्षकक्षमता असलेल्या नॉटिंगहॅम स्टेडियमची खेळपट्टी यावेळीही फलंदाजांच्या प्रेमात राहिल. एक महिन्यापूर्वीच येथे झालेल्या रॉयल लंडन एकदिवसीय स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरने दोनवेळा ४०० धावा झळकावल्या होत्या. सामन्याच्या उत्तरार्धात फिरकीपटूंना लाभ मिळेल.