भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ पुरता कोलमडला आहे. विंडिजचा निम्मा संघ शंभरीच्या आतच माघारी परतला आहे. मोहम्मद शमीने सलामीच्या दोन्ही फलंदाजाना माघारी धाडत विंडिजला धक्के दिले. यानंतर रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा यांनी १-१ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक धक्का दिला. अखेर रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी अखेरची काही षटकं खेळून काढत संघाची पडझड थांबवली. दुसऱ्या दिवसाअखेरीस वेस्ट इंडिजने ६ गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावांपर्यंत मजल मारली आहे.

त्याआधी अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ६४९ धावांपर्यंत मजल मारली आहे. रविंद्र जाडेजाने तळातल्या फलंदाजांना सोबतीला कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. जाडेजाने शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. जाडेजाने नाबाद १०० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार लगावले आहेत.

त्याआधी पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीची नोंद केली. ऋषभ पंतच्या साथीने संघाचा किल्ला लढवत विराटने आपल्या कारकिर्दीतलं २४ वं  शतक झळकावलं. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेही आक्रमक फटकेबाजी करत विराटला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत पंतने काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत आपलं शतक साजरं करेलं असं वाटत असतानाच देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.

अखेर उपहारानंतर विराट कोहलीला माघारी धाडण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. लुईसच्या गोलंदाजीवर देवेंद्र बिशुने कोहलीचा झेल घेतला. कोहलीने २३० चेंडूत १३९ धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूने जाडेजाने किल्ला लढवत ठेऊन आपलं पहिलं वहिलं शतक साजरं केलं. वेस्ट इंडिजकडून देवेंद्र बिशुने ४ तर शेरॉन लुईसने २ बळी घेतले.

Live Blog

16:47 (IST)05 Oct 2018
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, वेस्ट इंडिज ९४/६

अखेरीस रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी अखेरची काही षटकं खेळून काढत संघाची पडझड थांबवली.

16:26 (IST)05 Oct 2018
वेस्ट इंडिजला सहावा धक्का

कुलदीप यादवने उडवला डार्विचचा त्रिफळा, वेस्ट इंडिजचा सहावा गडी माघारी

16:23 (IST)05 Oct 2018
रोस्टन चेस - डार्विचकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न

दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत वेस्ट इंडिजच्या संघाला पन्नाशीची धावसंख्या गाठून दिली.

15:56 (IST)05 Oct 2018
विंडिजचा निम्मा संघ माघारी

सुनील अँब्रिस रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर माघारी

15:52 (IST)05 Oct 2018
वेस्ट इंडिजला चौथा धक्का

चोरटी धाव घेण्याच्या नादात शिमरॉन हेटमेयर धावचीत, विंडिजला चौथा धक्का

15:23 (IST)05 Oct 2018
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, शाई होप माघारी

रविचंद्रन आश्विनने शाई होपला माघारी धाडत विंडिजला तिसरा धक्का दिला.

15:01 (IST)05 Oct 2018
विंडिजला लागोपाठ दुसरा धक्का, कायरन पॉवेल माघारी

शमीने पॉवेलला यष्टीचीत करुन वेस्ट इंडिजला दुसरा धक्का दिला.

15:00 (IST)05 Oct 2018
वेस्ट इंडिजला पहिला धक्का, क्रेग ब्रेथवेट माघारी

मोहम्मद शमीने कर्णधार क्रेग ब्रेथवेटचा त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं

14:24 (IST)05 Oct 2018
रविंद्र जाडेजाचं शतक, भारताने केला डाव घोषित

रविंद्र जाडेजाने आपलं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं वहिलं शतक झळकावलं. जाडेजाच्या शतकानंतर कर्णधार विराट कोहलीने ६४९ धावांवर आपला डाव घोषित केला.

13:57 (IST)05 Oct 2018
भारताला नववा धक्का, उमेश यादव बाद

क्रेग ब्रेथवेटने घेतला उमेश यादवचा बळी

13:56 (IST)05 Oct 2018
भारताला आठवा धक्का, कुलदीप यादव माघारी

देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर कुलदीप पायचीत होऊन माघारी

13:15 (IST)05 Oct 2018
अश्विन ७ धावांवर झेलबाद, बिशूने मिळवला तिसरा बळी

फिरकीपटू अश्विन ७ धावांवर झेलबाद झाला. पृथ्वी शॉला बाद करणाऱ्या बिशूने या डावातील तिसरा बळी मिळवला. त्याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डावरीच याने त्याचा झेल घेतला. त्यामुळे भारताला सातवा गडी गमवावा लागला.

12:41 (IST)05 Oct 2018
कर्णधार कोहली माघारी, भारताला सहावा धक्का

अखेर शतकवीर विराट कोहलीला माघारी धाडण्यात वेस्ट इंडिजला यश आलं आहे. लुईसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात देवेंद्र बिशुकडे झेल देत कोहली माघारी परतला आहे.

12:40 (IST)05 Oct 2018
पहिल्या सत्रावर भारताचं वर्चस्व कायम

पहिल्या सत्रापर्यंत भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ५०६ धावांपर्यंत मजल मारली आहे.

11:03 (IST)05 Oct 2018
भारताचा पाचवा गडी माघारी, ऋषभ पंत झेलबाद

देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नान पंत झेलबाद. पंतची कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी

10:56 (IST)05 Oct 2018
कर्णधार विराट कोहलीचं शतक

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आपलं वर्चस्व कायम राखत विराटने आणखी एका शतकाची नोंद केली आहे.

10:31 (IST)05 Oct 2018
ऋषभ पंतचं अर्धशतक

ऋषभने आक्रमक खेळी करत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.

10:31 (IST)05 Oct 2018
विराट कोहली - ऋषभ पंतच्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला

पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे