वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करत मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने १ डाव आणि २७२ धावांची सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ५, रविंद्र जाडेजाने ३ तर रविचंद्रन आश्विन २ विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे.

पहिला डाव १८१ धावांमध्ये आटोपल्यानंतर फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या विंडिजच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, मात्र रविचंद्रन आश्विनने क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत विंडिजला पहिला धक्का दिला. तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत विंडिजने एका गड्याच्या मोबदल्यात ३३ धावांपर्यंत मजल मारली, मात्र उपहारानंतर विंडिजचा डाव पुन्हा एकदा गडगडला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विंडिजचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. कायरन पॉवेल आणि शाई होप यांच्यात झालेली ४७ धावांची भागीदारी आणि मधल्या फळीत रोस्टन चेसने पॉवेलला दिलेली साथ या जोरावर वेस्ट इंडिजचे १५० धावांचा टप्पा ओलांडला. पॉवेलने भारतीय फिरकीपटूंवर चांगला हल्लाबोल करत अर्धशतक झळकावलं. मात्र ८३ धावांवर त्याला कुलदीपच्या गोलंदाजीवर माघारी परतावं लागलं. यानंतर विंडीजचे उरलेले सर्व फलंदाज हे हजेरीवीर ठरले.

त्याआधी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या भेदक माऱ्यासमोर पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १८१ धावांमध्ये कोलमडला. पहिल्या दिवसात ६ गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावांपर्यंत मजल मारणारा वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही फारशी मजल मारु शकला नाही. काही फलंदाजांनी धावा जमवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने एकाकी झुंज देत ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवशीच्या खेळातील पहिल्या सत्रात आश्विनने वेस्ट इंडिजच्या शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधीच दिली नाही. एकामागोमाग एक बळी जाण्याचं सत्र सुरुच राहिल्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ १८१ धावांमध्ये कोलमडला. पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, मोहम्मद शमीने २ तर उमेश यादव, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला. विंडिजचा एक फलंदाज धावबाद झाला.

 

 

Live Blog

15:48 (IST)06 Oct 2018
चहापानानंतर विंडीजचे २ फलंदाज माघारी,भारत सामन्यात विजयी

पहिल्याच कसोटीत भारत १ डाव २७२ धावांनी विजयी, मालिकेत १-० ने आघाडी

14:13 (IST)06 Oct 2018
दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत वेस्ट इंडिज १८५/८

चहापानाआधी शेवटच्या चेंडूवर देवेंद्र बिशू माघारी, भारत विजयापासून २ विकेट दूर

14:03 (IST)06 Oct 2018
किमो पॉल माघारी, वेस्ट इंडिजला सातवा धक्का

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पॉल उमेश यादवकडे झेल देत माघारी

13:47 (IST)06 Oct 2018
कायरन पॉवेल माघारी, विंडिजला सहावा धक्का

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने पकडला झेल, अर्धशतकवीर पॉवेलची झुंज संपुष्टात

13:43 (IST)06 Oct 2018
रोस्टन चेस माघारी, विंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला

कुलदीपच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या नादात चेस माघारी

13:02 (IST)06 Oct 2018
कुलदीपचा विंडिजला आणखी एक धक्का, सुनिल अँब्रिस यष्टीचीत

कुलदीपच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात अँब्रिस यष्टीचीत

12:59 (IST)06 Oct 2018
विंडीजला तिसरा धक्का

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात हेटमायर माघारी. लोकेश राहुल माघारी

12:57 (IST)06 Oct 2018
कायरन पॉवेलचं अर्धशतक

कायरन पॉवेलने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक साजरं केलं

12:57 (IST)06 Oct 2018
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर होप माघारी, वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

शाई होप पायचीत, विंडीजची जोडी फुटली

12:55 (IST)06 Oct 2018
कायरन पॉवेल - शाई होप जोडीने संघाचा डाव सावरला

दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर हल्लाबोल करत ४७ धावांची भागीदारी केली.

11:32 (IST)06 Oct 2018
वेस्ट इंडिजला पहिला धक्का, ब्रेथवेट माघारी

रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर ब्रेथवेट माघारी,  पृथ्वी शॉने घेतला झेल.

तिसऱ्या दिवसाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला, वेस्ट इंडिज ३३/१

11:30 (IST)06 Oct 2018
दुसऱ्या डावात विंडिजच्या सलामीवीरांची सावध सुरुवात

क्रेग ब्रेथवेट आणि किरन पॉवेल या सलामीवीरांनी विंडीजला सावध सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये ३२ धावांची छोटेखानी भागीदारी

10:53 (IST)06 Oct 2018
विंडीजचा अखेरचा गडी माघारी

गॅब्रिएलला यष्टीचीत करत आश्विनने वेस्ट इंडिजचा डाव संपवला, पहिल्या डावात विंडिज १८१

10:46 (IST)06 Oct 2018
विंडिजला नववा धक्का, लुईस माघारी

आश्विनने उडवला लुईसचा त्रिफळा, विंडीजची पडझड सुरुच

10:33 (IST)06 Oct 2018
वेस्ट इंडिजचा संघ अडचणीत

१५९ धावांवर वेस्ट इंडिजचा आठवा गडी बाद, आरएल चेसला ५३ धावांवर अश्विनने केले बाद

10:31 (IST)06 Oct 2018
१४७ धावांवर वेस्ट इंडिजला सातवा धक्का

केएमए पॉलला ४७ धावांवर कुलदीप यादवने पूजाराकरवी झेलबाद केले.

09:42 (IST)06 Oct 2018
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.