भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील हैदराबाद कसोटीत भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजची पुन्हा एकदा दाणादाण उडवली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात शार्दुल ठाकूरच्या अनुपस्थितीत भारताच्या उमेश यादवने विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडला. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांचा समर्थपमे सामना केलेल्या विंडीजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र भारतासमोर नांगी टाकली. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल 6 विक्रमांची नोंद केली.

6/88 – कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात उमेश यादवची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याचसोबत हैदराबादच्या मैदानातही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी झहीर खानने न्यूझीलंडविरुद्ध 2010 साली 68 धावांत 4 बळी घेतले होते.

7 – आपल्या 50 व्या कसोटी डावामध्ये पायचीत होण्याची लोकेश राहुलची ही सातवी वेळ ठरली. गेल्या 9 कसोटी डावांमध्ये लोकेश त्रिफळाचीत किंवा पायचीत होऊन माघारी परतला आहे.

106 – पहिल्या डावात रोस्टन चेसने 106 धावांची खेळी केली. भारताविरुद्ध रोस्टन चेसचं हे दुसरं कसोटी शतक ठरलं.

13 – कसोटी क्रिकेटमध्ये 40 ते 50 धावसंख्येदरम्यान बाद होण्याची विराट कोहलीची ही तेरावी वेळ ठरली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली 40-50 धावसंख्येदरम्यान तब्बल 22 वेळा बाद झाला आहे. या यादीत सौरव पहिल्या स्थानी आहे, तर विराट आठव्या स्थानावर आहे.

12 – 5 कसोटींच्या छोटेखानी कारकिर्दीत ऋषभ पंतने 12 षटकार ठोकले आहेत. भारतीय यष्टीरक्षकांमध्ये आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीने पंतपेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

30 – विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 30 बळी घेतले आहेत. शेनॉन गॅब्रिएलसह यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा होल्डर विंडीजचा संयुक्तरित्या पहिला गोलंदाज ठरला आहे.