रोहित शर्माने झळकावलेलं दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात विंडीजचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विंडीजच्या 323 धावांचा पाठलाग करताना रोहितने नाबाद 152 तर विराटने 140 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घालत, अनेक दिग्गजांचे विक्रम मोडलेही.

6 – रोहित शर्माचं वन-डे क्रिकेटमधलं हे सहावं दीडशतक ठरलं. रोहितने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर यांचा विक्रम मोडीत काढला.

3 – एकाच वन-डे सामन्यात दोन पेक्षा जास्त भारतीयांनी 140 पेक्षा जास्त धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली.

6 – वन-डे क्रिकेटमध्ये एकाच डावात किमान सहा षटकार ठोकण्याची रोहित शर्माची ही सहावी वेळ ठरली. याआधी पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने 13 वेळा तर ख्रिस गेलने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे.

2 – रोहित शर्मा वन-डे क्रिकेटच्या इतिहासात भारतामध्ये सर्वात जलद 4 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. सुनिल गावसकर यांनी 86 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. रोहितने यासाठी 87 डाव घेतले.

9 – रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीपासून सुरुवात करत आतापर्यंत सलग 9 वन-डे मालिकांमध्ये शतक झळकावलं आहे.

2 – वन-डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 6 हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे.

1 – विराट आणि रोहितची विंडीजविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 246 धावांची भागीदारी. भारताची वन-डे क्रिकेटमधली विंडीजविरुद्ध ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.

5 – विराट कोहली आणि रोहित शर्मामधली ही पाचवी द्विशतकी भागीदारी ठरली.

14 – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे 14 वं शतक ठरलं. या शतकासह विराटने एबी डिव्हीलियर्सचा 13 शतकांचा विक्रम मोडीत काढला. सध्या रिकी पाँटींग 22 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

5 – भारताकडून एका कॅलेंडर वर्षात 2 हजार धावा पूर्ण करण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ ठरली आहे. या कामगिरीसह विराटने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सध्या श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा विराट व सचिनच्या पुढे आहे.

8 – 200 व्या वन-डे सामन्यात शून्यावर बाद होणारा मार्लन सॅम्युअल्स आठवा फलंदाज ठरला.

13 – विंडीजच्या शिमरॉन हेटमायरने 13 डावांमध्ये आपलं वन-डे क्रिकेटमधलं तिसरं शतक साजरं केलं. या कामगिरीसह हेटमायरने व्हिव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला.

2 – ऋषभ पंत भारताकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा दुसरा तरुण खेळाडू ठरला आहे.