वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर, दुसऱ्या कसोटीसाठी भारताकडे आपल्या राखीव फळीची ताकद आजमावून पाहण्याची सुवर्णसंधी तयार झाली आहे. भारताचा माजी खेळाडू मुरली कार्तिकने दुसऱ्या कसोटीत कोहलीला विश्रांती देऊन मयांक अग्रवालला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यामुळे भारत विराटला विश्रांती देण्याचा धोका पत्करु शकतो, याचसोबत मयांकला संधी मिळाल्यास आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याच्या फलंदाजीतलं कसब तपासून घेता येईल असंही मत मुरली कार्तिकने व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : विंडीज संघाबाबतच्या खोचक ट्विटवरून हरभजनला ‘बेस्ट’ चपराक

“एक संघ म्हणून या मालिकेतून तुम्हाला काय मिळवायचं आहे हे नक्की करायला हवं. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तुम्ही खेळाडूंच्या शोधात असाल तर, विराटला दुसऱ्या कसोटीत खेळवायची गरज आहे का? ज्याप्रमाणे आशिया चषकात आपण कोहलीला विश्रांती दिली, त्याचप्रमाणे कोहलीच्या अनुपस्थितीमध्येही भारत दुसरी कसोटी जिंकू शकतो”, स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीशी बोलत असताना कार्तिकने आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – मुंबईच्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट

शिखर धवनला विश्रांती देऊन मयांक अग्रवालला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत स्थान देण्यात आलं होतं. “विराट हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज आहे, माझ्या मते दुसऱ्या कसोटीत त्याने बाहेर बसावं. सध्या ज्या पद्धतीने विराट खेळी करतोय हे पाहता, दुसऱ्या कसोटीसाठी मयांक अग्रवालला संधी देण्यास काहीच हरकत नाहीये. चेतेश्वर पुजारासारखे फलंदाज हे फक्त कसोटी क्रिकेट खेळतात, तुम्ही त्यांना संघाबाहेर पाठवू शकत नाही. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तुम्ही मयांक अग्रवालला संघात घेण्याचा विचार करत असाल तर त्याला दुसऱ्या कसोटीत स्थान मिळायला हवं.” मुरली कार्तिकने आपलं मत मांडलं. यानंतर दुसऱ्या कसोटीत संघात भारत काय बदल करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – धोनीला कर्णधार केलं म्हणून निवड समिती नाराज?