शेमरॉन हेटमायर आणि शाई होपने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने वन-डे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नई वन-डे सामन्यात भारताने विजयासाठी दिलेलं २८८ धावांचं आव्हान यशस्वीरित्या पार पाडत विंडीजने ८ गडी राखून सामना जिंकला आहे. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. शेमरॉन हेटमायरने १३९ तर शाई होपने नाबाद १०२ धावा केल्या. ४८ व्या षटकातच विंडीज फलंदाजांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – IND vs WI : हेटमायरच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज निष्रभ, मैदानाच्या चौफर फटकेबाजी

भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत दोन्ही विंडीज फलंदाजांनी भारताकडून विजय हिसकावून घेतला. टी-२० मालिकेप्रमाणे पहिल्या वन-डे सामन्यातही भारताचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी फारशी प्रभावी वाटली नाही. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – Video : थेट मैदानाबाहेर, हेटमायरच्या फटकेबाजीसमोर विराट कोहलीही हतबल

त्याआधी, श्रेयस अय्यर-ऋषभ पंत आणि अखेरच्या षटकांत रविंद्र जाडेजा आणि केदार जाधवने केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात २८७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेल्डन कोट्रेलने आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताला दोन दणके दिले. मात्र यानंतर भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला.

भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. सुरुवातीच्या षटकांमध्ये राहुल आणि रोहित शर्मा या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळताना अडचण होत होती. अखेरीस कोट्रेलने सातव्या षटकात राहुल आणि विराटला माघारी धाडत भारताला धक्के दिले. यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित शर्माही ३६ धावा काढून अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या तरुण खेळाडूंनी सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली.

दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. चौथ्या विकेटसाठी पंत आणि अय्यरने ११४ धावा जोडल्या. पंत ७१ तर श्रेयस अय्यर ७० धावांवर माघारी परतला. यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत धावांचा ओघ सुरुच ठेवला. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या तळातल्या फळीतील फलंदाजांनी संघाला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कोट्रेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी २-२ तर कायरन पोलार्ड यांनी १ बळी घेतला.

Live Blog

Highlights

    21:56 (IST)15 Dec 2019
    शाई होप-निकोलस पूरन जोडीकडून विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब

    शाई होपनेही झळकावलं शतक, ८ गडी राखून विंडीज विजयी

    मालिकेतही घेतली १-० ने आघाडी

    21:04 (IST)15 Dec 2019
    अखेर विंडीजची जमलेली जोडी फुटली, हेटमायर माघारी

    मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना हेटमायर श्रेयस अय्यरच्या हाती झेल देऊन माघारी

    १०६ चेंडूत हेटमायरच्या ११ चौकार आणि ७ षटकारांनिशी १३९ धावा

    दुसऱ्या विकेटसाठी हेटमायरची शाई होपसोबत २१८ धावांची भागीदारी

    20:32 (IST)15 Dec 2019
    शेमरॉन हेटमायरचं शतक, विंडीज फलंदाजांची अभेद्य भागीदारी

    वन-डे कारकिर्दीतलं हेटमायरचं पाचवं शतक

    दुसऱ्या बाजूने अर्धशतकी खेळी करत शाई होपची हेटमायरला चांगली साथ

    19:51 (IST)15 Dec 2019
    शेमरॉन हेटमायरचं अर्धशतक, विंडीजचा डाव सावरला

    भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत हेटमायर आणि शाई होपची दमदार फलंदाजी

    दोघांमध्ये झालेल्या शतकी भागीदारीमुळे विंडीजचा डाव सावरला

    18:31 (IST)15 Dec 2019
    वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी

    दीपक चहरच्या गोलंदाजीवर अँब्रिस पायचीत

    17:42 (IST)15 Dec 2019
    भारताची २८७ धावांपर्यंत मजल

    विंडीजला विजयासाठी २८८ धावांचं आव्हान

    खराब सुरुवातीनंतरही भारताचं चांगलं पुनरागमन

    17:37 (IST)15 Dec 2019
    अखेरच्या षटकांत भारताला आठवा धक्का

    किमो पॉलच्या गोलंदाजीवर शिवम दुबे माघारी

    17:27 (IST)15 Dec 2019
    भारताला सातवा धक्का

    रविंद्र जाडेजा माघारी, रोस्टन चेसच्या थ्रोवर विंडीजला यश

    17:23 (IST)15 Dec 2019
    केदार जाधव - रविंद्र जाडेजाची महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी

    किमो पॉलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना केदार पोलार्डच्या हाती झेल देऊन बाद

    अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत केदार जाधवच्या ४० धावा

    16:44 (IST)15 Dec 2019
    भारताला पाचवा धक्का, ऋषभ पंत माघारी

    पोलार्डच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर उभ्या असलेल्या हेटमायरकडे झेल देऊन पंत बाद

    ६९ चेंडूतक ७ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने पंतच्या ७१ धावा

    16:30 (IST)15 Dec 2019
    अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, श्रेयस अय्यर माघारी

    अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर श्रेयस कर्णधार पोलार्डकडे झेल देत बाद

    चौथ्या विकेटसाठी पंत-अय्यरची ११४ धावांची भागीदारी, ८८ चेंडूत श्रेयसच्या ७० धावा

    अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश

    16:07 (IST)15 Dec 2019
    पंत-श्रेयस अय्यरची अर्धशतकं, भारताचा डाव सावरला

    दोन्ही खेळाडूंनी संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला.

    प्रदीर्घ कालावाधीनंतर ऋषभ पंतचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक

    14:56 (IST)15 Dec 2019
    खेळपट्टीवर जम बसवलेल्या दोन मुंबईकरांची जोडी फुटली, रोहित शर्मा माघारी

    सुरुवातीला दोन धक्के बसल्यानंतर रोहित शर्मा - श्रेयस अय्यरची अर्धशतकी भागीदारी, तिसऱ्या विकेटसाठी जोडल्या ५५ धावा

    मात्र अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर कर्णधार कायरन पोलार्डकडे झेल देऊन रोहित माघारी, रोहितच्या ३६ धावा

    14:07 (IST)15 Dec 2019
    कोट्रेलचा भारताला आणखी एक दणका, कर्णधार कोहली माघारी

    चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन थेट यष्टींवर, अवघ्या ४ धावांत कोहली बाद

    14:07 (IST)15 Dec 2019
    भारतीय संघाची अडखळती सुरुवात, लोकेश राहुल माघारी

    शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर राहुल माघारी, सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांच्या धावगतीवर अंकुश लावल्याचा विंडीजला फायदा

    शेमरॉन हेटमायरने घेतला झेल, १५ चेंडूत राहुलच्या सहा धावा

    13:29 (IST)15 Dec 2019
    मुंबईकर शिवम दुबेचं वन-डे संघात पदार्पण

    असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ...

    13:29 (IST)15 Dec 2019
    वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

    असा असेल विंडीजचा अंतिम ११ जणांचा संघ...

    मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: West indies tour of india 2019 ind vs wi 1st odi chennai live updates psd
    First published on: 15-12-2019 at 13:24 IST