धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेले इंग्लंड-वेस्ट इंडिज संघ आमनेसामने; पावसाची शक्यता कमी

गेल्या काही दिवसांपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत फक्त पावसाचीच फलंदाजी पाहायला मिळत आहे. मात्र शुक्रवारी सलग तीनही सामन्यांत सहज तीनशे धावांचा टप्पा गाठणारा यजमान इंग्लंड आणि धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेला वेस्ट इंडिज हे दोन संघ आमनेसामने येत असल्यामुळे चाहत्यांना षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे.

इंग्लंडने विश्वचषकाच्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी धूळ चारली, तर पाकिस्तानविरुद्ध त्यांना १४ धावांनी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र बांगलादेशविरुद्ध इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत १०६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे तूर्तास इंग्लंड गुणतालिकेत तीन सामन्यांतून चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे वेस्ट इंडिजने पहिल्या लढतीत पाकिस्तानला १०५ धावांत गुंडाळून मग सात गडी राखून सरशी साधली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी हाराकिरी पत्करल्यामुळे १५ धावांनी पराभव झाला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे विंडीजला तीन सामन्यांतून तीन गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

उभय संघांमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेली एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती, तर एक सामना पावसामुळेच रद्द करण्यात आला होता. या मालिकेत ख्रिस गेल आणि जोस बटलर यांनी अक्षरश: धावांचे रतीब रचले होते.

बेअरस्टो, मॉर्गनची इंग्लंडला चिंता

इंग्लंडचा कर्णधार ईऑम मॉर्गन आणि सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांना अद्याप लौकिकाला साजेशा खेळ करता आलेला नाही. इतर फलंदाजांच्या कामगिरीमुळे बेअरस्टो-मॉर्गन यांच्याकडे लक्ष जात नसले तरी पुढील सामन्यांत इंग्लंडला हे महागात पडू शकते. परंतु यंदाच्या विश्वचषकातील पहिले दीडशतक साकारणारा जेसन रॉय आणि तीन सामन्यांत प्रत्येकी एक अर्धशतक व शतक झळकावणारा जोस बटलर यांच्यापासून वेस्ट इंडिजला सावध राहावे लागणार आहे.

गेल वादळाला रोखणार कोण?

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन शतकांसह ३९ षटकारांची आतषबाजी करणाऱ्या गेलला रोखणे, हेच इंग्लंडच्या गोलंदाजांपुढील सर्वात मोठे आव्हान असेल. त्याचप्रमाणे आंद्रे रसेल, शाय होप यांनीसुद्धा आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. मात्र अनुभवाची कमतरता त्यांच्या खेळात दिसून येते. त्याशिवाय रसेलच्या तंदुरुस्तीबाबतही अद्याप संभ्रम कायम आहे. गोलंदाजीत ओशाने थॉमस, रसेल, शॅनन कॉट्रेल या वेगवान त्रिकुटाने अप्रतिम कामगिरी केली असून दोन्ही सामन्यांत त्यांनी पहिल्या १० षटकांमध्ये किमान तीन बळी मिळवले आहेत.

बटलर पूर्णपणे तंदुरुस्त

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना कंबरेखालील भागाला झालेल्या दुखापतीमुळे यष्टिरक्षण टाळणारा बटलर या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी दिली. त्याशिवाय कन्यारत्नामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याला मुकणारा मोईन अलीही या सामन्यासाठी उपलब्ध आहे.

आर्चरवर इंग्लंडची मदार

वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे जन्मलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडसाठी कशी कामगिरी करतो, यावर सर्वाचे लक्ष आहे. मुख्य म्हणजे वेगाशिवायच स्विंग गोलंदाजीसुद्धा आर्चरची ताकद असल्याने तो विंडीजच्या फलंदाजांना रोखू शकतो. सामन्याच्या उत्तरार्धात फिरकी गोलंदाजांना सहायता मिळण्याची शक्यता असल्याने लिआम प्लंकेट, मार्क वूड किंवा ख्रिस वोक्स यांपैकी एकाला संघाबाहेरचा रस्ता दाखवून मोईल व आदिल रशीदसह इंग्लंड मैदानात उतरू शकते.

साऊदम्पटन मैदानावर आतापर्यंत एकदाच ३००हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग झाला आहे. न्यूझीलंडने २०१७ मध्ये ३०६ धावांचे लक्ष्य गाठले होते.