भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिज फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला फॉलोऑन वाचवता आला नाही. भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिज पहिला डाव २४३ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजच्या दुस-या डावाला सुरुवात होताच इशांत शर्माने वेस्ट इंडिजला क्रेग ब्राथवेटच्या रुपात पहिला झटका दिला. दिवसअखेरीस वेस्ट इंडिजसंघाची १ बाद २१ धावा अशी दयनिय अवस्था झाली आहे. दिवसअखेरपर्यंत मोहम्मद शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी चार बळी तर, अमित मिश्राने दोन आणि इशांत शर्माने एक बळी मिळवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
दरम्यान, दुखापतीतून सावरलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नामोहरम करत दमदार पुनरागमन केले. अनुभवी इशांत शर्मा आक्रमणाचा प्रमुख असतानाही कर्णधार विराट कोहलीने विश्वासाने शमीकडे चेंडू सोपवला आणि त्याने हा विश्वास सार्थ ठरवला. शमीच्या भेदक माऱ्यासमोर खेळताना तिसऱ्या दिवशी उपाहाराला वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद ९० अशी अवस्था केली. विश्रांतीनंतर ताजातवाना झालेल्या शमीने अनुभवी मार्लन सॅम्युअल्स आणि जरमाइन ब्लॅकवूडला माघारी धाडत वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडार पाडले.
१ बाद ३१ वरुन पुढे खेळणाऱ्या वेस्ट इंडिजला देवेंद्र बिशूच्या रुपात पहिला धक्का बसला. अमित मिश्राने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने १२ धावा केल्या. क्रेग ब्रेथवेट आणि डॅरेन ब्राव्हो जोडीने धोका न पत्करता खेळ केला. मात्र शमीच्या उसळत्या चेंडूने ब्राव्होला चकवले आणि यष्टीपाठी साहाने सुरेख झेल टिपला. ब्राव्होने ११ धावा केल्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या मार्लन सॅम्युअल्सकडून वेस्ट इंडिजला मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र जराही पदलालित्य नसलेल्या सॅम्युअल्सने शमीच्या गोलंदाजीवर साहाकडेच झेल दिला. सॅम्युअल्सने केवळ एक धाव करता आली. त्याच षटकांत जरमाइनला ब्लॅकवूडला बाद करत शमीने वेस्ट इंडिजला अडचणीत आणले. उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याचा मोह ब्लॅकवूडच्या अंगलट आला. अजिंक्य रहाणेने शिताफीने झेल टिपल्यामुळे ब्लॅकवूडला भोपळाही फोडता आला नाही. अशा रीतीने भारतीय गोलंदाजांनी एक-एक करत वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाला माघारी धाडल.
तत्पूर्वी कर्णधार कोहलीच्या द्विशतकातून प्रेरणा घेत सहाव्या स्थानावर बढती मिळालेल्या रवीचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी साकारली. योगायोग म्हणजे अश्विनने कसोटी कारकीर्दीतील तिन्ही शतके वेस्ट इंडिजविरुद्धच झळकावली आहेत. कोहलीचे द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या बळावर भारताने ८ बाद ५६६ धावसंख्येवर डाव घोषित करत वर्चस्व गाजवले.
कोहली आणि अश्विन जोडीने एकेरी, दुहेरी धावांबरोबर चौकारांचा रतीब कायम राखत धावफलक हलता ठेवला. कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर चौकार लगावत अश्विनने अर्धशतक पूर्ण केले. अनाठायी धोका न पत्करता, प्रत्येक फटका काळजीपूर्वक खेळणाऱ्या कोहलीने रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या द्विशतकी खेळीची नोंद केली. प्रथम श्रेणी कारकीर्दीतीलही कोहलीचे हे पहिलेच द्विशतक आहे. भारताबाहेर भारतीय कर्णधाराने झळकावलेले हे पहिलेच द्विशतक आहे.
द्विशतकानंतर लगेचच कोहली बाद झाला. त्याने २४ चौकारांसह २०० धावांची खेळी साकारली. कोहली-अश्विन जोडीने पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी केली. वृद्धिमान साहा ८८ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर चौकार खेचत अश्विनने शतक पूर्ण केले. अश्विनने अमित मिश्राला हाताशी घेत सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. क्रेग ब्रेथवेटने अश्विनची खेळी संपुष्टात आणली. त्याने १२ चौकारांसह ११३ धावांची खेळी केली. अश्विन बाद झाल्यावर मिश्राने आकर्षक टोलेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ६ चौकारांसह ५३ धावा केल्या.