जमैकाच्या मैदानावर आपल्या कारकिर्दितील पहिले शतक झळकावत रोस्टन चेसने भारतीय संघाचे दुसरी कसोटी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. पहिल्या डावात अवघ्या दहा धावावर तंबूचा रस्ता धरलेल्या चेसने भारताने दिलेल्या ५०० धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६९ चेंडूमध्ये १३७ धावांची नाबाद खेळी केली. त्याने केलेली संयमी खेळी आणि मध्यफळीतील फलंदाज ब्लॅकवूडने त्याला दिलेली सुरेख साथ यामुळे पहिल्या डावात अवघ्या १९६ धावावर आटोपलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात ६ बाद ३८८ धावा करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळविले. पाचव्या दिवशी ४ बाद ४८ या धावसंख्येवरून पुढे खेळताना वेस्ट इंडिजचा डाव झटपट गुंडाळण्याचे स्वप्न भारतीय संघ पाहत होता. पण ब्लॅकवूडने भारताच्या गोलंदाजीवर प्रहार केला. ब्लॅकवूडने फक्त ५४ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर त्याने चेसबरोबर पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली. फिरकीपटू आर. अश्विनने ब्लॅकवूडला बाद करत ही जोडी फोडली. मात्र त्यानंतर चसने वेस्ट इंडिज यष्टीरक्षक शेन डॉवरिच याच्या साथीने वेस्ट इंडिजच्या डावाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात केली. डॉवरिचने ११४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत ७४ धावांची भर घातली. अमित मिश्राने त्याला पायचित करुन वेस्ट इंडिजला सहावा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज कर्णधार जेसन होल्डरने देखील दुसऱ्या डावात संयमी खेळी केली. नाणेफेक जिंकून फलदाजी घेण्याच्या निर्णयानंतर पराभव पदरात पडू नये, यासाठी मैदानावर तग धरुन त्याने ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९९ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी केली. भारताकडून वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात अमित मिश्रा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. तर इशांत शर्मा आणि आर. आश्वनला प्रत्येकी एक बळी टीपला. भारताला विजयापासून रोखण्यासाठी अखेरपर्यंत मैदानावर नाबाद राहिलेल्या रोस्टन चेसला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.