News Flash

भारताची रंगीत तालीम

अध्यक्षीय संघाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामना आजपासून

| July 14, 2016 03:14 am

अध्यक्षीय संघाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामना आजपासून

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अध्यक्षीय संघाविरुद्धचा सराव सामना हा जणू भारतासाठी रंगीत तालीमच असणार आहे.

या तीनदिवसीय सराव सामन्यातील कामगिरीनंतर पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे अंतिम ११ खेळाडू निश्चित होणार आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांचे आपल्या कामगिरीसह लक्ष वेधण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असेल.

पहिल्या दोनदिवसीय सराव सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज झगडताना आढळले. याचप्रमाणे सांघिक कामगिरीसुद्धा लक्षणीय नव्हती. दुखापतीतून परतल्यावर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतल्यावर चांगली सुरुवात केली. मात्र लाइन आणि लेंग्थ या बाबतीत त्यांनी निराशा केली. अनुभवी इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्याकडूनसुद्धा कोहलीची उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सराव सामन्यात भारताचा वेगवान मारा निष्प्रभ ठरताना लेग-स्पिनर अमित मिश्राने नेत्रदीपक गोलंदाजी केली. राजेंद्र चंद्रिका आणि जर्मेन ब्लॅकवूड यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केल्यामुळे मिश्राला हॅट्ट्रिकची संधी चालून आली होती, परंतु ती त्याला साधता आली नाही. मिश्राने त्या सामन्यात चार बळी घेतले. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हेसुद्धा या सराव सामन्यात आपली गोलंदाजी अजमावतील.

फलंदाजीत भारताच्या आघाडीच्या फळीने उत्तम कामगिरी केली होती. सलामीवीर के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतके झळकावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये धवनच्या फलंदाजीत सातत्य कधीच दिसून आले नव्हते. सलामीच्या स्थानासाठी मुरली विजय हा आणखी एक स्पर्धक आहे. चेतेश्वर पुजाराने डाव सोडण्यापूर्वी १०२ चेंडूंत ३४ धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माने १०९ चेंडूंत नाबाद ५४ धावा काढल्या. तथापि, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्या सामन्यात निराशा केली होती.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ अध्यक्षीय संघ : लिऑन जॉन्सन (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, रोस्टन चेस, जेसन डेवीज, शेन डॉरिच, शाय होप, डॅमिन जेकॉब्स, किऑन जोसेफ, माक्र्विनो मिंडले, विशॉल सिंग, जोमेल वॉरिकॅन.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून.

 

**************************************

 

विंडीजच्या कसोटी संघात टेलरच्या जागी कमिन्स

सेंट जॉन्स : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी उत्सुक असलेला वेगवान गोलंदाज मिग्युएल कमिन्सची भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात निवड झाली आहे. टेलरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने ही बदलाची घोषणा केली. २५ वर्षीय कमिन्सने ४१ प्रथम श्रेणी सामन्यांत खेळून ११६ बळी (सरासरी २२.५६) मिळवले आहेत. वर्षांच्या पूर्वार्धात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज संघात कमिन्सचा समावेश होता. मात्र त्याला कोणत्याही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

 

***************************************

 

नांदेडला राज्य बॅडमिंटन स्पर्धा

नांदेड : शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कनिष्ठराज्यस्तरीय बॅडिमटन स्पर्धा गुरुवारपासून नांदेडला सुरू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य बॅडिमटन असोसिएशन आणि नांदेड शहर जिल्हा बॅडिमटन असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली १७ व १९ वयोगटातील मुला-मुलींसाठी एकेरी व दुहेरी गटांसाठी ही स्पर्धा होणार आहे. स्पध्रेसाठी राज्यभरातून किमान २५० ते ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र बॅडिमटन असोसिएशनच्या माध्यमातून या स्पध्रेत राज्य बॅडिमटन असोसिएशनच्या मुला-मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:14 am

Web Title: west indies vs india practice match
Next Stories
1 संघर्षमयी प्रदर्शनामुळे रिओ ऑलिम्पिकच्या तयारीला मदत झाली : श्रीकांत
2 कुंबळे लावणार ‘टीम इंडिया’ला शिस्त!
3 ऑलिम्पिकच्या क्रीडांगणावर तपानंतर मुंबईकर हॉकीपटू
Just Now!
X