News Flash

६,६,६,६,६,६… सहा चेंडूत सहा षटकार; पोलार्डने युवराजच्या विक्रमाशी केली बरोबरी

तब्बल १४ वर्षानंतर युवराजच्या विक्रमाशी बरोबरी करणारी कामगिरी

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेदरम्यान (West Indies vs Sri Lanka) सुरु असणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. ४१ चेंडू आणि चार गडी राखत वेस्ट इंडिजच्या संघाने सामना खिशात घातला. विंडिजकडून कायरन पोलार्डने (Kieron Pollard) कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. पोलार्डने अकीला धनंजयच्या (Akila Dhananjay) एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. या पराक्रमबरोबरच पोलार्डने युवराज सिंग (Yuvraj Singh) , हर्शल गिब्सच्या (Herschelle Gibbs) विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. युवराजने टी-२० तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.

पोलार्डने विंडीज संघाची फलंदाजी सुरु असतानाच पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करत विक्रमी कामगिरी केली. पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळालं आहे.

पोलार्डच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलार्ड मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरला तेव्हा वेस्ट इंडिजचे चार फलंदाज तंबूत परतले होते. लेंडल सिमन्स २६ धावा, एविन लुईस २८ धावा यांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर क्रिस गेल आणि निकोलस पूरन भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर पोलार्डने वेस्ट इंडिज संघाच्या विजय मिळवून देत तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिली सामना जिंकला.

पोलार्डने सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याची कामगिरी करत क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तिसरा खेळाडू होण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केलाय. यापूर्वी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने २००७ च्या आयसीसी वर्ल्ड टी-२० मध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये सलग सहा षटकार लगावले होते. युवराजच्या आधी दक्षिण आफ्रीकेचा नावजलेला फलंदाज हर्षल गिब्सने त्याच वर्षी म्हणजेच २००७ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. गिब्सने नेदरलॅण्डविरोधातील सामन्यामध्ये डान वैन बुंगेच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सहा षटकार लगावले होते. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा पोलार्ड हा पहिलाच वेस्ट इंडियन खेळाडू ठरलाय.

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. वेस्ट इंडिजच्या संघाने १३.१ षटकांमध्येच सहा गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करत सामना चार गाडी राखून जिंकला. या मालिकेतील पुढचा सामना ६ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 8:33 am

Web Title: west indies vs sri lanka kieron pollard hit six straight sixes in a t20 scsg 91
Next Stories
1 फिरकी भारी, तर थेट लॉर्ड्सची वारी!
2 सात्त्विक-अश्विनीचा धक्कादायक विजय
3 मेरी उपांत्य फेरीत
Just Now!
X