* सामनावीर डॉटिनचे तडाखेबंद अर्धशतक
* वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलियात रंगणार अंतिम सामना
हम किसीसे कम नहीं.. हा नारा देत वेस्ट इंडिजचा संघ ‘सुपर-सिक्स’मध्ये दाखल झाला.. न्यूझीलंडनंतर पाच वेळा विश्वचषक पटकावणाऱ्या आणि यंदाच्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत वेस्ट इंडिजने स्पर्धेतील सर्वात मोठा धक्का दिला. वेस्ट इंडिजने धडाकेबाज फलंदाज डीएन्ड्रा डॉटिनच्या तडफदार अर्धशतक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला आठ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत होता, पण अंतिम फेरीपूर्वी पदरी पडलेला पराभव ऑस्ट्रेलियाच्या नक्कीच जिव्हारी लागलेला असेल. त्यातच वेस्ट इंडिजचाच संघ त्यांच्यापुढे अंतिम फेरीत उभा ठाकला असल्याने हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर वेस्ट इंडिजची ५ बाद ५९ अशी अवस्था होती, त्यावेळी त्यांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचे बोलले जात होते. पण त्यानंतर डॉटिनने अप्रतिम फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. तिने ६७ चेंडूंत १० चौकार आणि एका खणखणीत षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. दुसऱ्या टोकाकडून तिला अपेक्षित साथ न लाभल्याने वेस्ट इंडिजला १६४ धावांवर समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलियासाठी १६५ धावांचे आव्हान नक्कीच मोठे नव्हते. पण पहिल्या धावेवरच त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर फलंदाजांनी डाव सावरल्याने ऑस्ट्रेलियाने ५ बाद १३० अशी मजल मारली. पण पुढच्या २६ धावांमध्ये विंडीजच्या पाच फलंदाजांना बाद करत धक्कादायक विजयाची नोंद केली. शानेल डेलीने यावेळी तीन तर स्टेफनी टेलरने दोन बळी मिळवले.

वेस्ट इंडिजच्या संघाला गांभीर्याने कोणी घेत नसले तरी ‘त्यांचा काही नेम नाही’ हे प्रत्येक संघाच्या मनात असते. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला वेस्ट इंडिजच्या पुरुष आणि महिला संघांनी मंगळवारी पराभूत करत ‘हम किसी से कम नहीं’ हेच दाखवून दिले आहे. महिलांच्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला ‘सुपर-सिक्स’ फेरीच्या अखेरच्या थरारक लढतीत ८ धावांनी विजय मिळवत इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान पटकावला. पुरुषांनीही ट्वेन्टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी पराभूत करत त्यांना त्यांच्याच मातीत तब्बल १६ वर्षांनी पराभूत करण्याची किमया साधली.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ४७ षटकांत सर्वबाद १६४ (डीएन्ड्रा डॉटीन ६०; मेगन शट ३/५०, होली फर्लिग ३/२७) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : ४८.२ षटकांत सर्वबाद १५६ (अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल ४५; शानेल डेली ३/२२).
सामनावीर : डीएन्ड्रा डॉटीन.