विदर्भ कबड्डी असोसिएशन आणि समर्थ क्रीडा मंडळाच्या सहकार्याने १४ ते १६ डिसेंबरदरम्यान पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे करण्यात आले आहे. अमरावती येथील बालाजी प्लॉट, राजा पेठ रोड येथे ही स्पर्धा होणार आहे. पुरुष गटात यजमान महाराष्ट्रासह राजस्थान, बीएसएनएल, विदर्भ, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि छत्तीसगढ असे आठ संघ सहभागी होणार आहे. महिलांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, विदर्भ, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि छत्तीसगढ असे सात संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत.
पुरुष आणि महिला गटातील संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना ‘अ’ गटात स्थान मिळाले आहे. या स्पर्धेसाठी दोन क्रीडांगणे तयार करण्यात आली असून ही स्पर्धा मातीवरच खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अव्वल चार जणांमध्ये स्थान पटकावणारे संघ पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बंगळुरू येथे होणाऱ्या अव्वल राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील.