महेंद्रसिंह धोनीच्या त्या ‘न भूतो न भविष्यती’ षटकाराला आज 10 वर्षे पूर्ण झाली. 1983 नंतर तब्बल 28 वर्षांचा मोठा काळ लोटत भारतीय संघाने 2011मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप आपल्या नावावर केला. 2 एप्रिल 2011च्या रात्री वानखेडेवर श्रीलंकेला नमवत धोनीसेना विश्वविजेती झाली. सचिन तेंडुलकरचे योगदान, कॅन्सरपूर्वी युवराजने देशासाठी दिलेला लढा, धोनीचे नेतृत्व, झहीर खानचा आवेश अशा गोष्टींनी सजलेली ही स्पर्धा भारतीय संघासाठी खास ठरली. आज या ऐतिहासिक विजयाला दहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघाचे हे विश्वविक्रमी हिरो आज काय करत आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का?

महेंद्रसिंह धोनी

महेंद्रसिंह धोनी 15 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र, विश्वचषक जिंकणारा हा कर्णधार इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात 9 एप्रिलपासून धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करेल. 2019च्या विश्वचषक स्पर्धेपासून धोनी आयपीएलव्यतिरिक्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. धोनी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत होता आणि शेतीतही गुंतला होता. धोनीकडे टेरिटोरियल आर्मी युनिटमध्ये लेफ्टनंट कर्नलचे मानद पदही आहे आणि त्याने अनेक वेळा सैन्याबरोबर प्रशिक्षण घेतले आहे.
2011च्या विश्वचषकानंतर त्याने 164 सामने खेळले आणि 2015च्या विश्वचषकातही भारताचे नेतृत्व केले.

विराट कोहली

2011च्या भारताच्या वर्ल्डकप संघात विराट कोहलीही होता. तेव्हापासून विराटने बरीच सुधारणा करत आपले एक स्थान निर्माण केले आहे. सध्या तो तीनही स्वरूपात भारताचा कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. तो सध्या चेन्नईमध्ये असून आयपीएल 2021च्या हंगामापूर्वी क्वारंटाइन कालावधीत आहे.

2011च्या विश्वचषकानंतर कोहलीने 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019च्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले. यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आणि टी-20 वर्ल्डकपमध्ये कोहली भारताचे नेतृत्व करेल.

वीरेंद्र सेहवाग

सेहवाग 2015मध्ये 37व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. माजी भारतीय सलामीवीर सेहवाग 2015पर्यंत आयपीएलमध्ये खेळला. निवृत्तीनंतर सेहवाग एक समालोचक आणि विश्लेषक आहे. सेहवाग हरियाणामध्ये स्वत: ची शाळा चालवतो.

सेहवागने अलीकडेच रायपूर येथे झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी-20 स्पर्धेत भाग घेतला. तो सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात स्पर्धा जिंकणार्‍या इंडिया लेजेंड्स संघाचा भाग होता.

2011च्या विश्वचषकानंतर सेहवागने 2013मध्ये भारतासाठी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. 2011 वर्ल्डकपनंतर त्याने 15 सामने खेळले. या काळात त्याने 513 धावा केल्या. यात त्याने एक शतक ठोकले होते.

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिनने नोव्हेंबर 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2012 ते 2018 दरम्यान त्याने संसदेत खासदार म्हणून काम केले.

सचिनने 5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आणि आयकॉन आहे. मास्टर ब्लास्टरने काही सामन्यात समालोचनही केले आहे. सचिनने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धा खेळली. ज्यामध्ये त्याच्या नेतृत्वातील इंडिया लेजेंड्स संघाने जेतेपद जिंकले. गेल्या आठवड्यात त्याला करोनाचे निदान झाले.

2011च्या विश्वचषकानंतर सचिन तेंडुलकरने केवळ 10 एकदिवसीय सामने खेळले होते. 2012मध्ये आशिया चषक स्पर्धेत त्याने शंभरावे शतक झळकावले होते.

युवराज सिंग

2011च्या विश्वचषकात युवराज भन्नाट फॉर्मात होता. त्याने मालिकावीर पुरस्कारासह देशवासियांची मनेही जिंकली. वर्ल्डकप विजयानंतर 7 महिन्यांनंतर युवराजला कर्करोगाचे निदान झाले. युवराज वर्ल्डकपमध्येही ट्यूमरशी झुंज देत होता. भारताच्या मोहिमेदरम्यान अष्टपैलू खेळाडूला अनेक वेळा उलट्या झाल्याचे समोर आले. 2012मध्ये अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर तो या आजारातून सावरला.

ऑगस्ट 2012पर्यंत युवराज पुन्हा भारताकडून खेळत होता. 2012 टी-20 विश्वचषक, 2014 टी-20 विश्वचषक आणि 2017 चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. युवराजने 2019मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती, पण त्याने 2020मध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. युवराजने विदेशात स्पर्धात्मक टी-20 स्पर्धा खेळल्या. रायपूरमधील रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्येही त्याचा इंडिया लेजेंड्स संघात समावेश केला.

वर्ल्ड कपचा नायक युवराज समालोचन आणि कोचिंगपासून दूर राहिला आहे. मात्र, युवराजने पंजाब राज्य संघाला मार्गदर्शन केले. युवराज ‘YouWeCan’ फाउंडेशन देखील चालवितो, ज्याचा हेतू जागरूकता, प्रतिबंध, लवकर निदान यांच्या माध्यमातून कर्करोगाविरुद्ध लढा देणे हे आहे.

2011च्या विश्वचषकानंतर युवराज सिंगने 30 एकदिवसीय सामने खेळले. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपदावर राहिलेल्या भारतीय संघाचा तो भाग होता.

गौतम गंभीर

गंभीर सध्या लोकसभेत खासदार म्हणून काम करत आहे. त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 2019मध्ये पूर्व दिल्ली मतदारसंघातून तो विजयी झाला.

देशातील वृत्तपत्रे आणि क्रीडा पोर्टलमध्ये एक विश्लेषक म्हणून गंभीर काम करतो. गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने गंभीर एक फाउंडेशन चालवतो.

गंभीरने डिसेंबर 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तोपर्यंत गंभीर इंडियन प्रीमियर लीग खेळला. 2014 आणि 2016या दोन पर्वात गंभीरने कोलकाता नाइट रायडर्स संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.

2011च्या विश्वचषकानंतर गंभीरने भारताकडून 33 एकदिवसीय सामने खेळले. 2013मध्ये त्याने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

झहीर खान

झहीर मागील 3 वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आहे. 2018मध्ये झहीर क्रिकेट डायरेक्टर म्हणून मुंबई संघात रूजू झाला आणि तेव्हापासून तो या संघाशी संबंधित आहे.

या भूमिकेव्यतिरिक्त झहीर एक सक्रिय समालोचक आणि विश्लेषक आहे. झहीर अलीकडच्या काळात हिंदी आणि इंग्रजी समालोचक पॅनेलचा एक भाग आहे. 2015च्या सुरुवातीला झहीरने आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, पण तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहिला. 2017मध्ये टी-20 क्रिकेटला निरोप देण्यापूर्वी त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व केले.

2011च्या विश्वचषकानंतर झहीर खानने केवळ 9 एकदिवसीय सामने खेळले. 2012मध्ये त्याने अखेरचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

हरभजन सिंग

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी भज्जी कोलकाता संघाकडून खेळणार आहे. मागील वर्षी त्याने आपले नाव मागे घेतले होते. क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त हरभजन ब्रॉडकास्ट गिगमध्ये स्वत: ला व्यस्त ठेवत आहे. आज तक आणि इंडिया टुडे यासह लोकप्रिय टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवरील एक सक्रिय विश्लेषक म्हणून तो काम करत आहे.

2011च्या विश्वचषकानंतर हरभजनने केवळ 10 एकदिवसीय सामने खेळले. 2016पर्यंत तो टी-20 आणि 2015 पर्यंत कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग होता.

आशिष नेहरा

आशिष नेहरा सक्रिय समालोचक आणि विश्लेषक आहे. 2017मध्ये नेहरा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. नेहरा 2017पर्यंत इंडियन प्रीमियर लीग खेळला, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी त्याने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले.

2011च्या विश्वचषकानंतर आशिष नेहरा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळू शकला नाही. 2017पर्यंत तो भारतासाठी टी-20 क्रिकेट खेळला.

श्रीशांत

श्रीशांत या वर्षाच्या सुरुवातीला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आणि देशांतर्गत व्हाईट बॉल स्पर्धेत केरळचे प्रतिनिधित्व केले. 2011च्या विश्वचषकात श्रीशांतने भारताचे प्रतिनिधित्व केले तेव्हा तो 28 वर्षांचा होता. 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याप्रकरणी त्याला 7 वर्षे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले. श्रीशांतने क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी राजकारण, अभिनय आणि रिअॅलिटी शोमध्ये नशीब आजमावले.

2011च्या विश्वचषकानंतर श्रीशांत भारताकडून एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात श्रीशांतवर बोली लावण्यात एकाही संघाने स्वारस्य दाखवले नाही.

सुरेश रैना

सुरेश रैना आयपीएलच्या पुनरागमनसाठी तयार आहे. वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2020मधून माघार घेतल्यानंतर रैना यंदा पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा खेळली.

धोनीने निवृत्तीची घोषणा केल्याच्या काही तासांनंतर रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पत्नी प्रियांकाबरोबर रैना भारतातील माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर देणारी संस्था चालवतो.

2011च्या विश्वचषकानंतर रैनाने 111 एकदिवसीय सामने खेळले. 2018 पर्यंत तो भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग होता. रैना 2013मध्ये चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघाचादेखील भाग होता.

आर अश्विन

2011मध्ये झालेल्या विजयानंतर अश्विनची प्रगती होत गेली. 2017पासून अश्विनने मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले नसले तरी या काळातील महान फिरकीपटू म्हणून त्याची गणना होते.

अश्विन सध्या मुंबईत आयपीएल 2021ची तयारी करत आहे. तो दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करणार आहे. अश्विनने चेन्नईकडून पंजाब संघात गेल्यावर त्या संघाचे नेतृत्व केले होते.

2011च्या विश्वचषकानंतर अश्विनने 102 एकदिवसीय सामने खेळले. 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. अश्विन 2015 वर्ल्डकप आणि 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा प्रमुख फिरकीपटू होता.

मुनाफ पटेल

मुनाफ पटेल 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. 2020मध्ये लंका प्रीमियर लीगच्या उद्घाटन सामन्यात त्याने कॅंडी टस्कर्सचे प्रतिनिधित्व केले. गेल्या महिन्यात झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजमध्ये खेळला होता. तो 2017पर्यंत आयपीएल आणि 2016पर्यंत घरगुती क्रिकेट खेळला. 2011च्या विश्वचषकानंतर मुनाफने केवळ 8 एकदिवसीय सामने खेळले.

युसूफ पठाण

युसूफ पठाणने 2021च्या फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने इंडिया लेजेंड्ससाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळली. युसूफ गेल्या आठवड्यात करोना पॉझिटिव्ह आला. 2012च्या हंगामापर्यंत तो आयपीएल खेळला. 2011च्या विश्वचषकानंतर युसूफने फक्त 6 एकदिवसीय सामने खेळले.

पीयुष चावला

पीयुष चावला सतत स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहे. आयपीएल 2021मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. 2021मध्ये विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चावला गुजरात संघाचा भाग होता.
2011च्या विश्वचषकानंतर चावला एकही एकदिवसीय सामन्यात भारताकडून खेळला नाही. डिसेंबर 2012मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने भारकताकडून अखेरचा टी-20 सामना खेळला.