भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची लोकप्रियता आणि कामगिरी दिवसेंदिवस शिगेला पोहोचताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जलदगती गोलंदाज इरफानने हार्दिक पांड्याला आणखी वेळ देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पांड्या सध्या चांगली कामगिरी करत आहे. कोणतेही दडपण न देता विराट कोहलीने त्याला खेळवावे, असे मत इरफानने व्यक्त केले. ‘क्रिकेट अॅकॅडमी ऑफ पठान्स’ आणि ओप्पो मोबाईल यांच्यातील कराराप्रसंगी त्याने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. इरफान म्हणाला की, हार्दिक पांड्या भारतीय संघात अष्टपैलूची भूमिका पार पाडत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे सोपे नसते. त्यामुळे त्याला आणखी वेळ देणे गरजेचे आहे. कोणत्याही दडपणाशिवाय त्याला खेळू द्यावे. त्याच्या अष्टपैलू खेळीने स्वत: प्रभावीत झाल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले

सध्या सुरु असणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबद्दलही त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पठाण म्हणाला की, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. पूर्वीचा ऑस्ट्रेलियन संघ आणि आत्ताचा संघ यात खूप अंतर आहे. पण या मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली हे मान्य करावेच लागेल.

बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असणारा इरफान पठाण देशांतर्गत सामन्यात बडोद्याचे नेतृत्व करतो. भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या तो आजही आशा बाळगून आहे. सध्याच्या घडीला आगामी रणजी सामन्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे सांगत त्याने भारतीय संघात परत येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. पठाण म्हणाला की, मी यो-यो टेस्टमध्ये १६ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. आगामी रणजी सामन्यात चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रीत करत असून याच कामगिरीच्या जोरावर भविष्यातील गोष्टी सहज शक्य होण्यास मदत होईल.

बडोद्याच्या रणजी स्पर्धेतील कामगिरीवर देखील त्याने समाधान व्यक्त केले. मागील दोन्ही सामन्यात युसुफ पठाणने शतकी खेळी केली. माझी कामगिरी देखील चांगली झाली. ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असलात तरी आम्ही त्यांना चांगली टक्कर दिली. त्यामुळे आमच्या संघातील सर्वच खेळाडुंचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचा आम्हाला आगामी सामन्यात फायदा होईल.