उद्या गुरूवारपासून भारत व ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरू होत आहे. एकूण चार सामन्यांच्या या मालिकेतील तिसरी कसोटी भारताची बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे. मेलबर्नला हा सामना होणार असून भारत ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट खेळण्याचा तसा दुर्मिळ प्रसंग आहे. साधारण प्रथाही अशी आहे की हा सामना बॉक्सिंग डेच्या दिवशीच सुरू होतो. भारताची तिसरी कसोटी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत मेलबर्नला होणार असून कसोटी मालिकेचं चित्रही त्यासुमारास स्पष्ट झालेलं असेल.

बॉक्सिंग डे नाव कसं पडलं?

हे नाव पडलं ग्रेट ब्रिटनमध्ये. ख्रिसमसच्या भेटीला इंग्लंडमध्ये ख्रिसमस बॉक्स म्हणतात. तिथल्या रिवाजाप्रमाणे बड्या असामी आपल्या कर्मचाऱ्यांना ख्रिसमसची भेट बॉक्समध्ये देतात. अर्थात हा दिवस असतो २५ डिसेंबर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परंपरेप्रमाणे सगळ्या नोकरांना सुट्टी असते. मग, ते सगळे कर्मचारी सुटीच्या दिवशी २६ डिसेंबर रोजी तो ख्रिसमस बॉक्स घेऊन आपापल्या घरी जातात व आपल्या कुटुंबियांना मालकानं दिलेला ख्रिसमस बॉक्स किंवा भेटवस्तू देतात. त्यामुळे २६ डिसेंबर या दिवसाला तो भेटीचा बॉक्स घरच्यांना देण्याचा दिवस म्हणजे बॉक्सिंग डे असं नाव पडलंय.

ऑस्ट्रेलियामध्ये काय परंपरा आहे?

ऑस्ट्रेलिया ब्रिटनच्याच स्वातंत्र्यपूर्व काळातील वसाहतीतील देश असल्यामुळे तिथंही ही प्रथा रूजली. १९५०-५१ च्या अॅशेस मालिकेतील मेलबर्न कसोटी २२ ते २७ डिसेंबर या कालावधीत झाली, त्यावेळी बॉक्सिंग डे मधल्या दिवशी होता. त्यामुळे २६ डिसेंबरच्या आजुबाजुला कधीही सामना सुरू झाला तरी त्याला बॉक्सिंग डे टेस्टच म्हणायचे. २६ डिसेंबर हा त्या कसोटी सामन्यात आला की ते पुरेसं असायचं. त्यानंतर १९७४-७५ मध्ये अॅशेस मालिकेत २६ डिसेंबर पासून तिसरी कसोटी खेळवण्यात आली. आणि आधुनिक काळात ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डेच्या दिवशी कसोटी सुरू करण्याची प्रथा पडली. १९८० मध्ये तर मेलबर्नवर दरवर्षी २६ डिसेंबर, बॉक्सिंग डेच्या दिवशी कसोटीची सुरूवात करण्याचा करारच करण्यात आला.