युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम रंगात आलेला असताना भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. टी-२०, वन-डे आणि कसोटी अशा तिन्ही संघामध्ये रोहित शर्माला जागा मिळालेली नाही. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. या दुखापतीचं कारण देत निवड समितीने रोहितची संघात निवड केलेली नाही. परंतू बीसीसीआयची वैद्यकीय टीम रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवून राहील असंही जाहीर करण्यात आलं. रोहितला संघात जागा न मिळाल्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यातच मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करत असताना व्हिडीओ सोशल मीडिया हँडवर पोस्ट केल्यामुळे संभ्रम आणखीनच वाढला. रोहितला नेमकी कसली दुखापत झाली आहे याबद्दल बीसीसीआयने माहिती देणं आवश्यक असल्याची मागणी सुनिल गावसकर यांनी केली. रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकत नसल्यामुळे कायरन पोलार्ड मुंबईचं नेतृत्व करतोय. तरीही रोहितल संघासोबत स्टेडीयममध्ये हजर असतो. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. “रोहित शर्माला झालेल्या दुखापतीबद्दल माझ्याही मनात शंका आहे. प्रसारमाध्यमांनी हे प्रश्न विचारायला हवेत. पहिल्यांदा सांगण्यात आलं की रोहित दुखापतग्रस्त आहे. जर असं असेल तर तो मैदानात काय करतोय?? मुंबईच्या दोन्ही सामन्यांना तो हजर होता, त्याला दुखापत झाली असेल तर त्याने आराम करुन लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे. त्यामुळे रोहितला दुखापत झाली असं वाटत नाही.” Cricbuzz संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने आपलं मत मांडलं.

दरम्यान, संघ निवडीच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल असा अहवाल निवड समितीला दिला. या अहवालात नितीन पटेल यांनी विशेष तळटीप नमूद केली ज्यात मेडीकल टीम रोहितच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. ज्यावरुन निवड समितीने रोहितचा संघात समावेश केला नाही. मात्र संघाची निवड झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यामुळे निवड समितीलाही आश्चर्य वाटलं. फिजीओंनी दिलेल्या अहवालावरुन निवड समितीने रोहितची संघात निवड केली नाही. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे रोहित शर्मा मुंबईच्या आगामी सामन्यांमध्ये खेळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.