26 January 2021

News Flash

‘महाराष्ट्र केसरी’नंतरपुढे काय?

१९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला कुस्तीमधील आणि एकूण वैयक्तिक पहिले पदक जिंकून देण्याची किमया खाशाबा जाधव यांनी साधली

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत केणी

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संभाव्य अपयशाच्या भीतीने केवळ राज्यातच चांदीची गदा मिरवत मानसन्मानाचे धनी होण्यात धन्यता मानणाऱ्यांची परंपरा यंदा तरी ‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर मोडणार का, याची उत्सुकता कुस्तीप्रेमींना लागली आहे. ही परंपरा मोडल्यास खऱ्या अर्थाने खाशाबा जाधव यांचा वारस निर्माण होऊ शकेल.

‘महाराष्ट्र केसरी’ विजेते व्हायचे, मग राज्यभरात होणारे मान-सन्मान घेत फिरायचे. मग स्वत:ची प्रशिक्षण संस्था सुरू करायची, हा या स्पर्धेचा वर्षांनुवर्षांचा इतिहास आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पराभूत झाल्यास नाक कापले जाईल, अशा प्रकारच्या भीतीपोटी हे यशस्वी मल्ल राज्यापुरतेच मर्यादित राहिल्याची उदाहरणे अधिक आहेत. याला काही अपवादसुद्धा आहेत. काहींची मजल ‘हिंद केसरी’पर्यंत गेली, तर मोजक्या मल्लांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. राज्यातील सर्वोत्तम मल्लाचा किताब आणि चांदीची गदा मिळवल्याचे समाधान टिकवत राहणे, हेच जर हर्षवर्धनने केले, तर ‘महाराष्ट्र केसरी’वीरांची परंपरा अशीच कायम राहील. पण त्याने राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धापर्यंत मजल मारली, तरच या किताबाला प्रतिष्ठा मिळेल.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन पुण्याच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आतापर्यंत झालेल्या स्पर्धाना मागे टाकत नेटक्या स्वरूपात नुकतेच पार पडले. संभाव्य विजेते अभिजित कटके आणि बाला रफीक शेख यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर हर्षवर्धनने ‘महाराष्ट्र केसरी’ची कुस्ती जिंकण्याचा पराक्रम दाखवला, इतकेच नव्हे तर पराभूत शैलेश शेळकेला आपल्या खांद्यावर उचलून घेत मैत्रीचे अनोखे दर्शन घडवले आणि क्रीडारसिकांची मने जिंकली. ‘महाराष्ट्र केसरी’ हा हर्षवर्धनच्या कारकीर्दीचा महत्त्वाचा टप्पा. पण पुढे काय? हाच प्रश्न खरा महत्त्वाचा आहे.

कुस्तीच्या पुरुष गटातील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील खुल्या गटात माती आणि गादी गटातील विजेत्यांमधील झुंज ही ‘महाराष्ट्र केसरी’ या किताबाचा विजेता ठरवते. १९६१पासून ‘महाराष्ट्र केसरी’च्या अध्यायाला प्रारंभ झाला. आता ही स्पर्धा हीरक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. शासनदरबारी देशी खेळांसाठी नेहमीच अनुकूल वातावरण राहिल्याने ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला निवृत्तिवेतनाची आणि तीनदा या किताबाला गवसणी घातल्यास प्रथम श्रेणीची शासकीय नोकरी या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विजय चौधरीने २०१४ ते २०१६ या कालखंडात वर्चस्व गाजवताना तिहेरी ‘महाराष्ट्र केसरी’ हा बहुमान मिळवला आणि शासकीय नोकरी पदरात पाडून घेतली. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चमकला नाही.

२०११ ते २०१३ या कालखंडात नरसिंग यादवने ‘महाराष्ट्र केसरी’मध्ये तिहेरी यश मिळवले. त्याने हेच यश आंतरराष्ट्रीय स्तरावर परावर्तित करताना आशियाई, राष्ट्रकुल आणि जागतिक पदकांची कमाई केली. २०१६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंतही तो झेपावला होता. परंतु उत्तेजकांच्या सेवनाने किंवा षड्यंत्राने त्याचा घात केला. त्याला रिओतून स्पर्धेत सहभागी न होताच माघारी परतावे लागले. राहुल आवारेसुद्धा ऑलिम्पिकसाठी जाऊ शकला असता. पण उत्तरेकडील वर्चस्वाने त्याची जागा नितीन तोमरने घेतली.

१९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला कुस्तीमधील आणि एकूण वैयक्तिक पहिले पदक जिंकून देण्याची किमया खाशाबा जाधव यांनी साधली. परंतु महाराष्ट्राच्या मातीतून गेल्या ६८ वर्षांत दुसरा ऑलिम्पिक पदक विजेता घडू शकलेला नाही, यातूनच ‘महाराष्ट्र केसरी’चे अपयश अधोरेखित होते. गेल्या १२ वर्षांत सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिका यांनी चार ऑलिम्पिक पदकांची कमाई केली. हे तिन्ही मल्ल उत्तरेचे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये उत्तरेचे वर्चस्व आहे. त्या वर्चस्वाला आव्हान देणारे मल्ल राज्यातून घडण्याची सर्वप्रथम आवश्यकता आहे.

कुस्तीमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी लष्करातील नोकरी सोडणाऱ्या हर्षवर्धनने ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा जिंकल्यानंतर यापुढे ही स्पर्धा खेळणार नाही. त्याऐवजी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिककडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. हर्षवर्धनची कारकीर्द आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी बहरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अन्यथा, सालाबादप्रमाणे यंदाही ‘महाराष्ट्र केसरी’चा जत्रोत्सव पार पडल्याचीच इतिहासात नोंद होईल.

उत्तेजकविरोधी सकारात्मक पाऊल

ताकदीच्या आणि क्षमतेच्या खेळांत उत्तेजकांचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतही काही मल्ल उत्तेजकांचे सेवन करीत असल्याचा दावा अभ्यासक गेली काही वर्षे करीत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) उत्तेजक चाचणी बंधनकारक करण्याची मागणी होत होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन्ही मल्लांची उत्तेजक चाचणी घेत एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या चाचण्या अधिक प्रमाणात घेण्याची आवश्यकता असल्याचे मतही जाणकारांकडून होत आहे.

परिपूर्ण नियोजन

बालेवाडीतील क्रीडा संकुल नागरी वस्तीपासून दूर असले तरी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यासाठी ते परिपूर्ण ठरले. नागरी वस्तीत होणाऱ्या स्पर्धामध्ये राजकीय पुढाऱ्यांचे मोठेपण, बैठकव्यवस्थेचे कृत्रिम आणि अपुरे नियोजन (परिणामी प्रेक्षक आखाडय़ापर्यंत जवळ बसणे) अशा अनेक समस्या जाणवायच्या. ‘महाराष्ट्र केसरी’ आणि अन्य लढतींच्या कालावधीत फक्त सामन्याचे यथोचित वर्णन करणारे समालोचन प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करणारे होते.

prashant.keni@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:48 am

Web Title: what next after maharashtra kesari abn 97
Next Stories
1 मर्यादित षटकांच्या संघात हार्दिकचे पुनरागमन?
2 प्रथम फलंदाजी करीत सातत्याने जिंकायचेय -धवन
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुलानी-तरे यांनी मुंबईला तारले
Just Now!
X