आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपचा मान अखेरीस Dream 11 ला मिळाला आहे. मंगळवारी बीसीसीआयने Dream 11 च्या नावाची घोषणा केली. तेराव्या हंगामासाठी Dream 11 बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजणार आहे. तेराव्या हंगामासाठी बीसीसीाय Dream 11 सोबत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत करार करणार आहे. काही दिवसांपूर्वी Tata Sons ही भारतासह जगभरात नावाजलेली कंपनी स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत आघाडीवर होती. भारतात चिनी कंपन्यांविरोधात असलेलं वातावरण लक्षात घेता बीसीसीआयही Tata Sons ला कंत्राट देण्याच्या तयारीत होतं. परंतु अंतिम क्षणी Tata Sons ने आपली अंतिम बोली लावलीच नसल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

स्पॉन्सरशिप शर्यतीत आघाडीवर असलेल्या Tata Sons चं नाव अचानक मागे कसं पडलं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Tata Sons ला स्पॉन्सरशिपच्या बदल्यात Tata Sons या कंपनीखाली ३ वेगवेगळे ब्रँड प्रमोट करण्याची परवानगी हवी होती. यासाठी चांगली बोली लावण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या नियमानुसार स्पॉन्सर्सना आपल्या एकाच ब्रँडचं प्रमोशन करता येणार होतं. हीच गोष्ट Tata Sons च्या विरोधात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Dream 11 व्यतिरीक्त Byju’s ने २०१ कोटी तर Unacademy ने १७० कोटींची बोली लावली होती. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा तेरावा हंगाम बीसीसीआय युएईमध्ये आयोजित करत आहे. २० ऑगस्टनंतर सर्व संघाला युएईला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अवश्य वाचा – …तर पुढील तीन वर्षांसाठी Dream 11 कडेच राहू शकते IPL स्पॉन्सरशिप