सलग पाचव्या पराभवानंतर दिल्ली चेन्नईशी भिडणार
दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ पाच सामने खेळलेला असला तरी त्यांना अजून एकाही विजयाला गवसणी घालता आलेली नाही. पराभवाच्या दुष्काळाच्या चक्रात दिल्लीचा संघ अडकला असून घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करताना विजयाची चव ते चाखणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने कडवी झुंज दिली होती. पण या लढतीतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीच्या संघात वीरेंद्र सेहवाग, कर्णधार महेला जयवर्धने, डेव्हिड वॉर्नरसारखे नावाजलेले फलंदाज आहेत. सेहवाग चांगल्या फॉर्मात नाही, स्वत:वर विश्वास नसल्याने त्याने बंगळुरूविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला येणे टाळले. वॉर्नरने काही चांगल्या खेळी केल्या असल्या तरी त्यामध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. महेलालाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इरफान पठाण हा गुणी अष्टपैलू संघात असला तरी त्याला चमक दाखवता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मार्ने मॉर्केल, आशिष नेहरा, जोहान बोथा आणि उमेश यादव यांना आतापर्यंत भेदक मारा करता आलेला नाही.
‘सर’ रवींद्र जडेजा हा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गोलंदाजीबरोबरच त्याने फलंदाजीमध्येही चमक दाखवली आहे. चेन्नईची फलंदाजीची भिस्त माइक हसी, मुरली विजय, सुरेश रैना, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर असेल. ड्वेन ब्राव्होसारखा दर्जेदार अष्टपैलू त्यांच्या ताफ्यात आहे. गोलंदाजीची जबाबदारी आर. अश्विन, डर्क नॅनेस आणि ख्रिस मॉरिस यांच्यावर असेल.
दोन्ही संघाचा विचार केला तर दिल्लीपेक्षा चेन्नईचा संघ नक्कीच वरचढ आहे. चेन्नईचे फलंदाज आणि गोलंदाज दर्जेदार असून चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचे पारडे जड असेल. पण दुसरीकडे दिल्लीच्या संघात धक्का देण्याची कुवत असून हा सामना चांगलाच रंगतदार होईल, अशी आशा आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ पासून.