भारतामध्ये किंवा कोणत्याही देशात क्रिकेटचे सामने असोत, खेळाडूंमध्ये होणारं स्लेजिंग हा आता अविभाज्य भाग झाला आहे. गोलंदाज किंवा फलंदाज अनेकदा समोरच्या खेळाडूची लय बिघडवण्यासाठी त्याला शाब्दिक टोमणे मारत सतावत असतात. अनेकदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या स्लेजिंगचा अनेकांना फटकाही बसला आहे. भारतीय खेळाडूही अनेकदा स्लेजिंग करण्यात पुढे असतात. टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने रणजी क्रिकेट खेळत असताना हार्दिक पांड्याने आपल्याला स्लेजिंग केल्याचा किस्सा सांगितला. तो KKR च्या सोशल मीडिया पेजवर बोलत होता.

“मी रणजी ट्रॉफी खेळत असताना आमचा सामना बडोद्याच्या संघाविरुद्ध होता. मला आठवतंय की हार्दिक मला गोलंदाजी करत होता. तो वारंवार मला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या गोलंदाजीवर एक-दोन फटके खेळण्याचा प्रयत्न केला पण बॉल फिल्डरकडे गेला. यावेळी त्याने मला, हे U-19 क्रिकेट नाहीये, मार ना…मार ना असं बोलून स्लेजिंग केलं. तो असं का करत होता मला खरंच कळत नव्हतं.” गिलने हार्दिक पांड्यासोबतच्या स्लेजिंगचा किस्सा सांगितला.

U-19 क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं केल्यानंतर शुभमन गिल अजुनही भारतीय संघात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी धडपडतो आहे. मात्र अद्याप गिलला भारतीय संघात म्हणावी तशी संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व करतो.