सय्यद किरमाणी यांचे जीवनगौरव पुरस्कारानंतरचे मत; कोहलीला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार; बीसीसीआय वार्षिक पुरस्कार सोहळा २०१४-१५

‘‘भारतासाठी जेव्हा जेव्हा खेळायला उतरलो, तेव्हा तिरंगा फडकवण्याचाच विचार मनात असायचा. देशासाठी सर्वस्व अर्पण करून चांगली कामगिरी करायची, हेच माझे ध्येय होते. यापूर्वी सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघात मला सी. के. नायडू यांच्या कप्तानीखाली स्थान मिळाले होते. आता दुसऱ्यांदा त्यांच्यासोबत नाव जुळल्याचा मला आनंद आहे,’’ असे मत भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केले. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी किरमाणी यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पॉली उम्रीगर पुरस्कार भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला देण्यात आला. या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार रेल्वेच्या मिताली राजने पटकावला. सर्वोत्तम संघटनेचा पुरस्कार कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यावर कोहलीने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, ‘‘विश्वचषकाच्या वेळी पाकिस्तानविरुद्धचे शतक माझ्यासाठी संस्मरणीय आहे. सामना सुरू होण्यापूर्वी मी भरपूर चाहत्यांना मैदानात येताना पाहात होतो. तिरंगी मालिकेत चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांनी आमच्यावर विश्वास कायम ठेवला होता. त्यांचा हा विश्वास सार्थकी लावण्याचे मी मनात ठरवले आणि माझ्याकडून शतक झाले.’’

रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार या वेळी मध्य प्रदेशच्या जलाज सक्सेनाला देण्यात आला. रणजी करंडकातील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार या वेळी कर्नाटकच्या रॉबिन उथप्पाने पटकावला. रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार या वेळी मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विनय कुमार यांना देण्यात आला. या दोघांनीही गेल्या मोसमामध्ये प्रत्येकी ४८ बळी मिळवले होते.

स्थानिक क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बडोद्याच्या दीपक हुडाला देण्यात आला. २३ वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार उत्तर प्रदेशच्या अल्मास शौकतला मिळवला. १९ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगला देण्यात आला. १६ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पंजाबच्या शुभम गिलला देण्यात आला. सर्वोत्तम कनिष्ठ महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार महाराष्ट्राच्या देविका वैद्यला देण्यात आला. स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पंचांचा पुरस्कार ओ. नंदन यांना देण्यात आला.

चिदम्बरम पुरस्कार

२३ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू : अलमास शौकत (उत्तर प्रदेश)

१९ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू : अनमोलप्रीत सिंग (पंजाब)

१६ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू : शुबमान गिल (पंजाब)

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू : मिथाली राज (रेल्वे)

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (युवा) : देविका वैद्य (महाराष्ट्र)