पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. शोएब त्याच्या धारदार गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाच्या फक्त यष्टयाच वाकवायचा नाही, तर समोरच्या फलंदाजाच्या मनात भीती सुद्धा निर्माण करायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड आजही शोएब अख्तरच्या नावावर आहे. २००३ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शोएबने निक नाइटला प्रतितास १६१.३ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.

या वेगामुळेच शोएबला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘द रावळपिंडी एक्स्प्रेस’ या नावाने संबोधले जायचे. शोएबला त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेकदा दुखापतींचाही सामना करावा लागला. “करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रतीतास १०० किलोमीटर या वेगाने गोलंदाजी करण्यासाठी काही जणांनी मला ड्रग्ज घेण्याचाही सल्ला दिला होता. पण मी त्यांचे ऐकले नाही” असे शोएबने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले.

“मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा तू वेगाने गोलंदाजी करु शकत नाहीस. काही जणांनी प्रतितास १०० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी मला ड्रग्ज घेण्याचा सल्ला दिला होता. पण मी नेहमीच या गोष्टीला नकार दिला” असे शोएब अख्तरने अमली पदार्थ विरोधी एका कार्यक्रमात सांगितले.

शोएबने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर या कार्यक्रमाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चांगल्या उज्वल भविष्यासाठी आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा, असे या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४६ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करताना त्याने १७८ विकेट घेतल्या. १६३ एकदिवसीय सामन्यात त्याने २४७ विकेट घेतले.