भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची त्याची अफलातून इनिंग असो किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन-डेतील त्याने केलेली आतषबाजी असो दिवसेंदिवस त्याची क्रिकेटच्या मैदानातील चमक वाढते आहे. आपल्या अफलातून फलंदाजीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या पांड्याचे हातही एकदा थरथर कापले होते. कारण पांड्याला अचानक त्याच्या देवानं दर्शन दिलं होतं. या देवाला पाहून पांड्याच्या हातातील जेवणाचे ताटच खाली पडलं. यावेळी त्याला काहीच सुचत नव्हते.

आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान पांड्या जेवण करत होता. त्यावेळी पाठीमागून त्याला कोणीतरी ‘हॅलो’ अशी हाक मारली. त्यानं मागे वळून पाहिलं. यावेळी लिटल मास्टर सुनील गावसकर दिसल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. यापूर्वी पांड्या त्यांना कधीच भेटला नव्हता. त्यामुळे त्यांना पाहून पांड्याच्या हातातील जेवणाचे ताट जमिनीवर पडले. खुद्द पांड्याने एका कार्यक्रमामध्ये हा किस्सा सांगितला होता.
या कार्यक्रमात पांड्या म्हणाला होता की, त्यावेळी मी फक्त त्यांच्याकडे पाहतच राहिलो. कारण मला देव दिसला होता. ते याठिकाणी येणार आहेत याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. त्यांनी स्वत: हाक मारल्यामुळे मला खूप आनंद झाला होता, असेही पांड्या यावेळी म्हणाला.
हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून प्रतिनिधीत्व केलं. या स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरीतून त्याने क्रिकेट जगतात नवा तारा चमकणार असल्याचे संकेत दिले होते.

आयपीएल सामन्यानंतरच त्याची भारतीय संघात निवड झाली. सध्याच्या घडीला सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता असणारा खेळाडू म्हणून पांड्याकडे पाहिलं जात. त्यानं अनेकदा हे सिद्धही केला.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पांड्यानं दमदार अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला होता. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचले होते. पहिल्या सामन्यातील त्याच्या खेळीनंतर आगामी सामन्यात त्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट चाहता निश्चितच प्रतिक्षेत असेल.