लंडन येथे सुरु असलेल्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत शतकी खेळी करणारी हरमनप्रीत कौर आता सर्व भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. अंतिम फेरीत भारताने यजमान इंग्लंडला पराभूत करुन विश्वचषक जिंकावा, यासाठी देशात ठिकठिकाणी होमहवन आणि पुजा केल्या जात आहेत. विश्वचषकातल्या कामगिरीबद्दल बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक सदस्याला ५० लाखांचं पारितोषिक जाहीर केलं. मात्र एक काळ असा होता की हरमनप्रीतला प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी झगडावं लागलं होतं.

२०१०-११ सालात हरमनप्रीत कौरला नोकरीची गरज होती. यासाठी हरमनप्रीतने पंजाब पोलिसांमध्ये अर्जही केला होता. मात्र महिला क्रिकेटपटूंना नोकरी देता येत नाही असं सांगत तत्कालीन पंजाब सरकारने हरमनप्रीतचा नोकरीचा अर्ज फेटाळला होता. हरमनप्रीतच्या नोकरीसाठी तिचे प्रशिक्षक आणि वडिलांना वारंवार पंजाब सरकारकडे अर्ज केले, मात्र त्यावेळी पोलिस दलातल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने, तुमची मुलगी हरभजन सिंह आहे का नोकरी द्यायला असा उरफाटा प्रश्न विचारला होता. यावेळी एकाही राजकीय पक्षाने आपल्या मुलीची मदत केली नसल्याचं हरमनप्रीतने वडिल हरमंधर सिंह भुल्लर यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे.

हरमनप्रीत कौर सध्या पश्चिम रेल्वेच्या सेवेत कार्यरत आहेत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीत असलेल्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी यांनी सचिन तेंडुलकरला हरमनप्रीतच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावेळी सचिन तेंडुलकरने केलेल्या शिफारसीवरुन हरमनप्रीतला पश्चिम रेल्वेत नोकरी मिळआली होती.

अवश्य वाचा – सचिनच्या पत्रामुळे हरमनप्रीत कौरला मिळाली रेल्वेत नोकरी

महिला क्रिकेटपटूंना मिळणारं मानधन, त्यांच्या सामन्यांना होणारी गर्दी, सामन्यांना मिळणारं प्रायोजकत्व यासर्व बाबतीत महिला क्रिकेटपटू कायम पिछाडीवर असतात. त्यातच चॅम्पियन्स करंडकात भारताचा पुरुष संघ पाकिस्तानकडून हरल्यानंतर महिलांनी केलेली कामगिरी ही अतिशय उल्लेखनीय आहे. त्यातच हरमनप्रीत कौरने केलेली शतकी खेळी भारताला अंतिम फेरीत घेऊन आली आहे, त्यामुळे हरमनप्रीतने आपल्या खेळीतून टीकाकारांना अशीच उत्तर देतं रहावं, अशी आशा सर्व भारतीय क्रिडारसिक करत आहेत.