मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कारकिर्द घडवण्यात त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचा महत्वाचा वाटा आहे. लहानग्या सचिनला आचरेकर सरांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर क्रिकेटचे धडे देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उभं केलं. आज वयाच्या 87 व्या वर्षी रमाकांत आचरेकर यांचं मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातील मान्यवर व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. आचरेकर सर हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जायचे. त्यांच्या अशाच एका शिस्तीचा किस्सा, खुद्द सचिनने 2017 साली गुरुपौर्णिमेला एका व्हिडीओतून सांगितला होता.

सचिन शाळेत असताना शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर संघाकडून खेळायचा. यावेळी आचरेकर सरांकडे प्रशिक्षण घेत असलेल्या सचिनसाठी सरांनी एक सराव सामना आयोजित केला होता. मात्र सचिनने या सामन्याला दांडी मारत वानखेडे मैदानावर जाऊन आपल्या शाळेच्या सिनीअर संघाचा सामना पाहणं पसंत केलं. आचरेकर सरांना ही गोष्ट समजताच त्यांनी तातडीने वानखेडे मैदान गाठलं. सचिनला स्टँडमध्ये बसलेलं पाहून आचरेकर सरांनी त्याला चांगलच झापलं. ”तुला दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्याची गरज नाही. आधी स्वतःचा खेळ सुधार, मग लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला येतील”, अशा शब्दांत त्यांनी सचिनला सर्वांदेखत डोस दिला. यानंतर मी कधीही सराव सामना बुडवला नाही असंही सचिन म्हणाला.