मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे भारतातील चाहत्यांसाठी दैवतच. वीस वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने नावलौकिक कमावला तसेच बरेच जाहिरातदारही त्याच्यामागे लागलेले असायचे. निवृत्तीनंतरही त्याच्या जाहिरातीच्या ब्रँड्समध्ये कमी झालेली नाही. पण एक काळ असा होता की सचिनला दादर स्टेशनहून घरी जाण्यासाठीही पैसे नव्हते, ही घटना दस्तुरखुद्द सचिननेच जिवंत केली.
‘ बारा वर्षांचा असताना माझी मुंबईच्या १५-वर्षांखालील संघात निवड झाली होती. पुण्याला तीन सामने होणार होते आणि मी या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी कमालीचा उत्सुक होतो. पहिल्या सामन्यात मी चार धावांवर धावचीत झालो आणि त्यानंतर मला संधी मिळाली नाही. त्यानंतरच्या सामन्यांदरम्यान पाऊस झाला. त्यामुळे आम्ही सारे चित्रपट पाहायला गेलो आणि त्यानंतर चविष्ट पदार्थाचा आस्वादही घेतला. पण तिथून मुंबईला आल्यावर माझ्या खिशामध्ये एकही पैसा नव्हता. त्यामुळे दादर स्टेशनहून मला शिवाजी पार्कपर्यंत चालत यावे लागले,’ असे सांगत सचिनने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तो पुढे म्हणाला की, ‘ तेव्हा जर माझ्याकडे मोबाइल असला असता तर घरच्यांना सांगून पैसे मागवता आले असते आणि मी टॅक्सीने घरी गेलो असतो. पण तसे झाले नाही. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानामध्ये बराच बदल झाला आहे आणि हा बदल आपल्यासाठी फार चांगला आहे.’