करोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. परदेशातील काही ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आल्या आहेत. पण सध्या तरी भारतात क्रिकेट किंवा इतर स्पर्धांना सुरूवात होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे घरी असलेले क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि सध्याचा मार्गदर्शक (मेंटॉर) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याबद्दल एका युवा खेळाडूने छान आठवण सांगितली. मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा डावखुरा नितीश राणा याने संघाला अनेकदा चांगली धावसंख्या गाठून देण्यास मदत केली. त्याने क्रिकबझला मुलाखत देताना एक झकास किस्सा सांगितला. “मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी जेव्हा मी सज्ज झालो, तेव्हा मी फलंदाजी करत होतो. त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि मुंबई संघाचे व्यवस्थापक राहुल संघवी यांचं बोलणं माझ्या मित्राच्या कानावर पडलं. त्याने लगेच धावत येऊन मला सांगितलं की तुझी फलंदाजी पाहून सचिन सर विचारत होते की हा मुलगा आहे कोण? सचिन सरांनी माझ्या फलंदाजीची दखल घेणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती. मला ते ऐकून खूप बरं वाटलं”, असं नितीश राणा म्हणाला.

“२०१५ च्या रणजी करंडक स्पर्धेत माझी कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे यावेळी मला IPL चं तिकीट मिळणार अशी माझी अपेक्षा होती. लिलाव प्रक्रिया सुरू असताना मी फलंदाजी करत होतो. मी जेव्हा मैदानात पाणी मागवलं, तेव्हा मला एकाने सांगितलं की तुला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतलं आहे. सुरूवातीला मला ती मस्करी वाटली. पण त्याने मला पुन्हा तीच गोष्ट सांगितल्यावर अखेर माझी खात्री पटली”, अशी आठवणही त्याने सांगितली.