कोटय़वधी चाहत्यांचा ताईत असलेला भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला पाहू न शकणाऱ्या दृष्टिहीन चाहत्यांनी त्याच्यावरील ऑडिओ पुस्तक तयार केले आहे हे पाहून सचिनही खूप भारावून गेला. पूना ब्लाईंड स्कूलच्या काही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ध्रुवतारा’ या पहिल्या ऑडिओ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात दक्षिण आफ्रिकेहून सचिनने थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा आपले मत व्यक्त केले.
सतीश नवले याच्या नेतृत्वाखाली काही अंध व काही डोळस व्यक्तींनी तयार केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन डेक्कन जिमखाना क्लब येथे अनोख्या प्रकारे करण्यात आले. पुस्तक तयार करण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या सतीश नवले, प्रवीण काचवा, हनुमंत जोशी, संजय उनेखे, मिलिंद कांबळे व मॉडर्न प्रशालेतील शिक्षिका नीता घोरपडे यांच्या हस्तेच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ऑडिओ पुस्तकाबाबत सचिन याने दक्षिण आफ्रिकेतून प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, अशा उपक्रमांमुळे मी खूपच आश्चर्यचकित झालो आहे. आजपर्यंत मी यशाचे शिखर गाठले आहे, त्यामध्ये माझ्या असंख्य चाहत्यांचा मोठा वाटा आहे. मला यश मिळावे म्हणून कोणी उपवास करतात तर कोणी नवस बोलतात. चाहत्यांच्या शुभेच्छांमुळेच मला प्रेरणा मिळते व माझा आत्मविश्वासही वाढतो. हे पुस्तक तयार करण्यासाठी नवले व त्याच्या सहकाऱ्यांनी जे उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखविले आहे, ती निष्ठा आम्हास प्रोत्साहन देणारी आहे. एक विलक्षण कलाकृती निर्माण करीत तुम्ही इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
पुस्तकाविषयी सतीश नवले म्हणाला, सचिन हा क्रिकेटचा श्वास आहे. आम्हाला त्याचा खेळ पाहता येत नसला तरी आकाशवाणीवरील समालोचनामुळे आम्ही प्रत्यक्ष त्याचा खेळ पाहात असल्याचा आनंद आम्हाला मिळत असतो. गतवर्षी सचिन याची भेट झाली आणि आम्हा अंधजनांचे जीवनच बदलून गेले आहे. अंधदिनानिमित्त आम्हास अनेक जण वेगवेगळ्या भेटी देत असतात मात्र सचिनला आज आपण अनोखी भेट द्यावी हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आम्ही हे पुस्तक तयार केले आहे. माझा डोळस मित्र विवेक जांभळे याने प्रेरणा दिल्यामुळेच मी हे काम करू शकलो.