एकीकडे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि वानखेडेचे क्युरेटर रवी शास्त्री यांच्यातील वाद शमलेला नाही. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, पण असे असताना भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने मोहालीचे क्युरेटर दलजित सिंग यांचे पदस्पर्श केल्याने अनेक चर्चाना ऊत आला होता. कोहलीचे हे कृत्य कशासाठी याचा नेमका थांग लागत नव्हता. पण दलजित सिंग हे कोहलीला वडिलांसमान आहेत. त्यामुळेच त्याने त्यांचे पाय धरल्याचे समजल्यावर उलट-सुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला.
गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना पीसीए स्टेडियमवर होणार आहे. गेल्या दोन दशकांपासून दलजित सिंग हे या स्टेडियमचे क्युरेटर म्हणून काम पाहत आहेत. सोमवारी कोहली काही खेळाडूंबरोबर स्टेडियमवर आला होता. त्या वेळी त्याने दलजित सिंग यांना वाकून नमस्कार केला. हा प्रकार पाहून सर्वानाच आश्चर्य वाटले. पण कोहलीला कनिष्ठ ते भारताचा कर्णधार हा प्रवास दलजित सिंग यांनी जवळून पाहिला आहे. कोहलीला दलजित सिंग हे पित्यासमान आहेत. त्यामुळेच लहानपणापासून आपल्याला पाहत आलेल्या दलजित सिंग यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना वानखेडेवर खेळवण्यात आला होती. त्या वेळी आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४३४ धावा केल्या होत्या. आफ्रिकेच्या फलंदाजीनंतर भारतीय संघाचे संचालक यांनी वानखेडेचे क्युरेटर सुधीर नाईक यांच्याशी असभ्य वर्तणूक करत शिवीगाळ केली होती. या प्रकाराची तक्रार नाईक यांनी बीसीसीआयकडे केली आहे.
एकीकडे क्युरेटर आणि संघातील सदस्य यांच्यातील निंदनीय प्रकार समोर आला आहे. पण त्यानंतर काही दिवसांनीच कोहलीने केलेले कृत्य हे क्रिकेट रसिकांना सुखावणारे असल्याचे म्हटले जात आहे.