करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खेळाडू सोशल मीडियावर विविध उपक्रमात सहभागी होऊन, आपल्या चाहत्यांशी संपर्कात आहेत. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा नुकतीस महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मंधाना यांच्या Double Trouble या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी सानिया मिर्झाने क्रीडापटू पती-पत्नीबद्दल असलेल्या विचारांवर भाष्य केलं.

“ज्या वेळी आपले पती मैदानात चांगली कामगिरी करतात, त्यावेळी ती त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर असते, आणि ज्यावेळी त्यांची कामगिरी खराब होते त्याचा दोष पत्नीवर येतो. मला माहिती नाही, असा विचार लोकं कसा करु शकतात.” काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क आणि त्याच्या पत्नीसंदर्भात जोरु का गुलाम असं एक ट्विट केलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अंतिम सामना रंगला होता. मिचेल स्टार्कची पत्नी अ‍ॅलेसा हेली ही ऑस्ट्रेलियन महिला संघाचं प्रतिनिधीत्व करते. आपल्या पत्नीला अंतिम सामन्यात खेळताना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मिचेल स्टार्कला आफ्रिका दौऱ्यावरुन लवकर सुट्टी दिली होती. मिचेल स्टार्कच्या या निर्णयाचं स्वागत करताना सानियाने, उपखंडात एखाद्या पतीने आपल्या पत्नीसाठी असं केलं असतं तर त्याल लगेच जोरु का गुलाम म्हणून चिडवण्यात आलं असतं असं म्हटलं होतं.

यावेळी सानियाने विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मामधल्या नात्याचंही कौतुक केलं.