१०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात, क्रिकेट या खेळाला अतिशय महत्व आहे. समस्त देशवासियांसाठी क्रिकेट हा एकाप्रकारे धर्मच आहे. सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूने आपल्या २० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत प्रत्येक भारतीयाच्या मनात घर निर्माण केलं. ९० च्या दशकात जन्माला आलेल्या अनेक तरुणांचा सचिन तेंडुलकर हा गळ्यातला ताईत बनला होता. सध्याच्या घडीचे अनेक क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला पाहून क्रिकेट खेळायला लागले आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात सचिन तेंडुलकरविषयी काही आठवणी असतात. भारतीय कसोटी संघात मधल्या फळीत खेळणारा फलंदाज हनुमा विहारीनेही, सचिन तेंडुलकरविषयी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगितला आहे.

“लहानपणापासून सचिन सर हे माझे आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी लहान असताना त्यांना फलंदाजी करताना पहायचो, आणि मला ते प्रचंड आवडायचं. ९० च्या दशकात आमच्यासाठी तो खेळाडू म्हणजे फलंदाजीचा राजा होता. ज्यावेळी ते बाद व्हायचे त्यावेळी मी खूप रडायचो आणि टिव्ही बंद करायचो.” हनुमा Cricbuzz संकेतस्थळाच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होता. हनुमाच्या मते सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारून बराच काळ लोटला आहे. मात्र अजुनही सचिनने आपल्या कारकिर्दीत केलेले अनेक विक्रम अबाधित आहेत. मध्यंतरीच्या काळात सचिनने राज्यसभेवर खासदार म्हणूनही काम पाहिलं आहे. या काळात त्याने अनेक समाजपयोगी कामं सचिनने केली आहेत. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये सचिन नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना घरात थांबून सरकारने सांगितलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन करत आहे. याचसोबत करोनाविरुद्ध लढ्यात सचिनने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदतही केली आहे.