हार्ड कोर्टच्या स्वरूपात असलेले सिमेंटचे कोर्ट, क्ले कोर्टच्या रूपात कौशल्याचा कस आजमवणारी लाल माती या दोन्हींपेक्षा विम्बल्डनची हिरवळ कोणत्याही टेनिसपटूला हवीहवीशी वाटणारी. या लोभसवाण्या हिरवळीवर विम्बल्डनचा झळाळता चषक नावावर करणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्नच. यंदाही फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धेचा लाल मातीवरचा थरार आटोपल्यानंतर प्रत्येक टेनिसपटूला वेध लागले ते सर्वात लोकप्रिय असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचे. उष्ण, दमट वातावरण आणि विजयासाठी घाम काढणारी लाल माती यांच्याऐवजी आल्हाददायक असे थंड वातावरण आणि खेळायला मोहात पाडणारी हिरवळ. यंदा विम्बल्डनला सुरुवात झाल्यानंतर हिरवळीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. खेळताना, धावताना हिरवळीवर कधी घसरणारे, कधी कोसळणारे टेनिसपटू हे दृश्य नित्याचे होऊन बसले. स्पर्धेतील तिसराच दिवस घसरणीचा आणि खेळाडूंच्या माघारीचा म्हणून विम्बल्डनच्या इतिहासात नोंदला गेला. दिग्गज टेनिसपटू सुरुवातीलाच बाहेर पडल्यामुळे विम्बल्डनच्या निसरडय़ा कोर्टचीच चर्चा अधिक झाली.
विम्बल्डन ही इंग्लंडच्या व्हिक्टोरियन संस्कृतीचा प्रभाव असलेली आणि तब्बल १२५हून अधिक वर्षांचा वारसा असलेली ही मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा. ग्रँड स्लॅम स्पर्धापैकी हिरवळीवर होणारी ही एकमेव स्पर्धा. खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यासाठी आणि प्रत्यक्ष मैदानावर खेळताना संयोजकांच्या नियमावलीचे पालन करावे लागते. नियम केवळ खेळाडूंसाठी नाहीत तर प्रेक्षकांसाठीही आहेत. त्यामुळे गडबड, गोंधळ, हलगर्जीपणा, चालढकल-टोलवाटोलवी या क्रीडा स्पर्धामध्ये घडणाऱ्या घटनांना इथे अजिबात थारा नाही. विम्बल्डन स्पर्धेने नीटनेटकेपणा आणि सभ्यता जपली आहे. या वर्षी विम्बल्डनची हिरवळ घसरणीची ठरू लागली आणि खेळाडूंनीही त्यावर आक्षेप घेतल्यामुळे क्युरेटर आणि त्यांची कार्यपद्धती यावर बरीच टीका झाली. एरव्ही ही मनमोहक हिरवळ कोण तयार करतात, असा प्रश्नही चाहत्यांच्या डोक्यात येत नाही. पण घसरणीचे सत्र सुरू झाल्यावर या कोर्टचे क्युरेटर नील स्टुबले चर्चेत आले. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनानंतर स्टुबले यांनी मुख्य क्युरेटर म्हणून कार्यभार स्वीकारला. नवख्या माणसाला क्युरेटरपदी नियुक्त केले आणि त्यांच्या सदोष कामामुळे आमची कारकीर्द धोक्यात आली, अशी गंभीर टीकाही खेळाडूंनी केली. पण स्टुबले विम्बल्डनला नवखे नाहीत. आधीचे क्युरेटर ईडी सिवर्ड यांच्या नेतृत्वाखालील चमू गेली १७ वर्षे कार्यरत होते. फरक एवढाच की, आता पदोन्नती मिळाली आहे. हिरवळीवरचा तगडा अनुभव गाठीशी असल्याने स्टुबले आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. घसरणीची अचूक कारणमीमांसा करून सर्वानी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देऊन त्यांनी वाद ओढवून घेतला नाही.
थंड वातावरण आणि मध्येच कोसळणाऱ्या सरी हे विम्बल्डन स्पर्धेदरम्यान नेहमीचे चित्र. पण यंदा इंग्लंडमध्ये वसंत ऋतूने चांगलेच बस्तान बसवले. गेल्या ५० वर्षांतला हा सर्वोत्तम वसंतऋतू असल्याचे हवामानतज्ज्ञांनी मत नोंदवले. मे-जून महिन्यातही थंडी आणि पावसाने नियमित हजेरी लावली. चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेच्या अनेक सामन्यांनाही याचा फटका बसला. विम्बल्डन स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही दिवसांत असेच वातावरण राहिले. सूर्याचे दर्शन झाल्यामुळे वातावरणात आद्र्रता होती. विम्बल्डनच्या हिरवळीने नैसर्गिक गुणधर्मानुसार ही आद्र्रता शोषून घेतली. याचा परिणाम म्हणजे गवत ओले, निसरडे आणि घसरणीला अनुकूल झाले. खेळाडूंच्या घसरणीला ते जबाबदार ठरले.
फ्रेंच स्पर्धेत क्ले-कोर्ट खेळण्याचा सराव झाल्यामुळे काही दिवसांतच होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेआधी खेळाडूंनी हिरवळीशी जुळवून घेणे आवश्यक होते. ग्रास कोर्टवर खेळताना, धावताना करावा लागणारा बदल, हे त्यामागचे मुख्य कारण. क्ले कोर्टवर खेळताना खेळाडूंना वेगवान, आक्रमक हालचाली करता येतात. मात्र हिरवळीवर खेळताना हालचालींवर मर्यादा येतात. प्रतिस्पध्र्याने केलेली सव्‍‌र्हिस कोणत्याही परिस्थितीत खेळून काढायची या पवित्र्यात केलेला आक्रमकपणा घसरणीला कारणीभूत ठरतो. सराव सामन्यांसाठी मुख्य कोर्ट उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यामुळे मुख्य कोर्टशी सुसंगत होण्यासाठी थेट सामन्याची वाट पाहावी लागते. पण दोन्ही कोर्टमध्ये बराच फरक असतो. म्हणूनच मुख्य कोर्टवर सराव करण्याची संधी मिळावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. क्ले-कोर्टनंतर लगेचच ग्रास-कोर्ट असे स्थित्यंतर टाळण्यासाठी पुढील वर्षांपासून विम्बल्डन स्पर्धा एक आठवडय़ाच्या कालावधीनंतर सुरू होणार आहे.
घसरण रोखण्यासाठी खेळाडूंनी बुटांना विशिष्ट प्रकारचे कवच बसवण्याची सुविधा आहे, मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या नियमांनुसार हे आवरण बसवता येत नाही. त्यामुळे कोणतेही पर्याय शिल्लक नसताना खेळाडूंना फक्त आपली कामगिरी साकार करायची असते. अशातच सरस कामगिरी करताना खेळाडूंना कोर्टवर धारातीर्थी पडावे लागत असेल तर संयोजकांनी ही घसरण गांभीर्याने घेऊन कोर्टवरील दोष दूर करण्याची आवश्यकता आहे. कोर्टवरील गंभीर स्वरूपाची दुखापत खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. खेळाडूंनी गवतावर खेळताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असले तरी अशा प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी संयोजकांनाही प्रतिष्ठेच्या स्पर्धासाठी कोर्ट बनवताना काळजी घ्यावी लागेल, तरच या स्पर्धेला कोणतेही गालबोट लागणार नाही.

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श