पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने नुकतंच भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागवर टीका करत वादाला तोंड फोडलं. शोएब अख्तर पैसा कमावण्यासाठी भारताचं कौतुक करत असतो असं सेहवागने २०१६ मध्ये एका चॅट शोमध्ये म्हटलं होतं. त्या तीन वर्ष जुन्या व्हिडीओवर शोएब अख्तरने प्रतिक्रिया देताना सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढे माझ्याकडे पैसे आहेत असं उत्तर दिलं होतं.

सेहवागच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शोएबने म्हटलं होतं की, “संपत्ती अल्लाह देतो भारत नाही. जेवढे सेहवागच्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे माझ्याकडे पैसे आहेत”. तसंच सोशल मीडियावर आपले फॉलोअर्सची संख्या जास्त असल्याचंही तो बोलला होता. यानंतर शोएबने लगेचच ही मस्करी असल्याचं स्पष्ट केलं. “मी मिश्कील पद्धतीने हे बोलत आहे. कृपया हा एक जोक म्हणूनच घ्या,” असंही यावेळी शोएबने सांगितलं होतं. तसंच आपले सोशल मीडिया फॉलोअर्सदेखील जास्त असल्याचा दावा त्याने केला होता.

अख्तरचा हा दावा खरा आहे का ?
शोएब अख्तरने संपत्तीच्या बाबतीत मोठा दावा केला असला तरी सत्य मात्र वेगळं आहे. खरं तर संपत्तीच्या बाबतीत शोएब अख्तर विरेंद्र सेहवागच्या जवळपासही फिरकत नाही. विरेंद्र सेहवागकडे शोएब अख्तरच्या दुप्पट संपत्ती आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, विरेंद्र सेहवागकडे एकूण ३०० कोटींची संपत्ती आहे. विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला असला तरी जाहिराती, समालोचन, क्रिकेट प्रशिक्षण, शाळा आणि सोशल मीडियावरील पेड प्रमोशनच्या माध्यमातून कोटींची कमाई करतो.

सेहवागने २०१९ मध्ये ४१ कोटींची कमाई केली. सेहवागने हरियाणामधील अनेक ठिकाणी शाळा सुरु केली आहे. सेहवाग इंटरनॅशनल स्कूल असं या शाळेचं नाव आहे. तर दुसरीकडे शोएब अख्तरची संपत्ती सेहवागच्या तुलनेत अर्धी आहे. शोएब अख्तरची एकूण संपत्ती १६३ कोटी इतकी आहे.

सोशल मीडिया फॉलोअर्स –
सोशल मीडियावरील फॉलोअर्सबद्दल बोलायचं गेल्यास तिथेही सेहवागच अव्वल आहे. शोएब अख्तरचे १९ लाख युट्यब फॉलोअर्स असून सेहवागचं कोणतंही युट्यूब चॅनेल नाही. मात्र हे दोघंही ट्विटरवर सक्रीय आहेत. ट्विटरवर शोएब अख्तरचे २७ लाख फॉलोअर्स असून सेहवागचे २ कोटी फॉलोअर्स आहेत.