आयपीएल 2021मध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध केलेल्या शानदार फलंदाजीनंतर पंजाब किंग्जच्या दीपक हुडाने आपल्या टीकाकारांना शांत केले आहे. पंजाब किंग्जसाठी हुडाने 28 चेंडूंत झटपट 64 धावा फटकावल्या. त्याची ही खेळी पंजाबसाठी निर्णायक ठरली आणि पंजाबने राजस्थानवर 4 धावांनी विजय मिळवला. आज पंजाबला आपला दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईत खेळायचा आहे. या सामन्यातही हुडा चौकार-षटकारांची आतषबाजी करणार या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेपूर्वी दीपक हुडा भारताचा क्रिकेटपटू कृणाल पंड्यासोबतच्या भांडणामुळे चर्चेत आला होता. या भांडणामुळे त्याला बडोदा संघातून निलंबित करण्यात आले. दीपक हुडाच्या वडिलांनी आता या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर अडचणीत असताना आपल्या मुलाल कोणी पाठिंबा दर्शविला, याचा उलगडला दीपक हुडाचे वडील जगबीर हुडा यांनी केला.

ते म्हणाले, “दीपकसाठी हा खूप कठीण काळ होता. त्याच्या साथीदारांमुळे त्याला कठीण वेळा सामोरे जावे लागले. एखाद्या स्पर्धेपूर्वी बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे आणि कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे गोष्टी आणखी वाईट होत गेल्या. दीपकने आवाज उठविला पण दुर्दैवाने त्यांच्यावर एका हंगामासाठी बंदी घातली गेली. तो खूप निराश झाला होता. अशावेळी त्याला पाठिंबा आवश्यक होता. त्यावेळी माझ्या मुलाल इरफान आणि युसुफ पठाण यांनी त्याचे खूप समर्थन केले. ते दोघेही माझ्या मुलाबरोबर नेटमध्ये बराच वेळ घालवत असत.”

23 एप्रिलला मुंबई वि. पंजाब मुकाबला

निलंबनामुळे दीपक हूडा यावर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी खेळू शकला नाही. दीपक हुडा आणि कृणा पंड्या हे दोन्ही खेळाडू 23 एप्रिल रोजी आमने सामने असतील, कारण या दिवशी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांचा सामना असणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर या दोन खेळाडूंमधील लढाईची चाहतेदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत. कोणावर कोणता खेळाडू भारी पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.