02 December 2020

News Flash

कोण होणार हिरवळीचा राजा

विम्बल्डन हा शब्द उच्चारताच टेनिसविश्वातल्या एका महान परंपरेचा पट डोळ्यांसमोर उभा राहतो. ‘शुभ्रवस्त्रांवृतां’ या संस्कृत सुभाषितामधील वर्णनाला शोभेल अशा पोशाखातील खेळाडू, अत्यंत मेहनतीने निर्मिलेली लोभसवाणी

| June 23, 2013 07:17 am

विम्बल्डन हा शब्द उच्चारताच टेनिसविश्वातल्या एका महान परंपरेचा पट डोळ्यांसमोर उभा राहतो. ‘शुभ्रवस्त्रांवृतां’ या संस्कृत सुभाषितामधील वर्णनाला शोभेल अशा पोशाखातील खेळाडू, अत्यंत मेहनतीने निर्मिलेली लोभसवाणी हिरवळीची कोर्ट्स, व्हिक्टोरियन परंपरेचे शिष्टाचार अंगीकारलेले प्रेक्षक, दर्जेदार टेनिसचा आस्वाद घेताना साथीला रसरशीत स्ट्रॉबेरी आणि क्रीम. ग्रँडस्लॅम स्पर्धेचा वारू पॅरिसमधल्या लाल मातीवरून लंडनच्या हिरवळीवर येऊन विसावला आहे. उष्ण, दमट वातावरणातून खेळाडू आता थंड आणि खेळासाठी साजेशा वातावरणात दाखल झाले आहेत. विम्बल्डनच्या ग्रास कोर्टशी जुळवून घेण्यासाठी मुख्य स्पर्धेआधी सराव स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धामध्ये आपली कौशल्ये पारखून जगभरातले नामवंत टेनिसपटू आता विम्बल्डनसाठी सज्ज झाले आहेत.
एखादा कालखंड विशिष्ट खेळाडूच्या वर्चस्वासाठी ओळखला जातो. मात्र सर्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीत विराजमान होतील असे तीन खेळाडू एकाच पर्वात एकत्र खेळणे हा दुर्मीळ योगायोग आहे. स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हेच ते त्रिकूट. समकालीन राजांनी राज्य करण्यासाठी विविध परगणे वाटून घ्यावेत तशी ग्रँडस्लॅम जेतेपद या त्रिकुटाने आपल्यामध्ये वाटून घेतली आहेत. ते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, एकेक गुणासाठी त्यांच्यात प्रचंड संघर्ष अनुभवायला मिळतो, पण कोणीच एकमेकांविरुद्ध बोलताना दिसत नाही. सामना सुरू होण्याआधी नाही, सामना संपल्यानंतरही नाही, याउलट समोरचा किती श्रेष्ठ खेळाडू आहे आणि तो किती चांगला खेळला याचेच ते भरभरून वर्णन करतात. या बोलण्यातच त्यांचे महानपण लपले आहे. या त्रिकुटामधील संयत स्पर्धेमुळे गेल्या पाच वर्षांत दर्जेदार खेळाची पर्वणी टेनिसचाहत्यांना मिळाली आहे. मात्र आता या त्रिकुटाची सद्दी निर्णायक टप्प्यावर आली आहे. गेल्या वर्षी चुरशीच्या लढतीत रॉजर फेडररने इंग्लंडच्या अँडी मरेवर मात करत जेतेपदाला गवसणी घातली. मात्र या यशानंतर फेडररच्या जेतेपदांना उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन जिंकल्यापासून आतापर्यंत फेडररला अवघ्या एका स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले आहे. विम्बल्डनचे ग्रास कोर्ट हे फेडररचे माहेरघर आहे. मात्र वयाचा परिणाम फेडररच्या खेळात स्पष्ट जाणवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जो विल्फ्रेड त्सोंगाने त्याला नमवले. निस्तेज, हालचाली मंदावलेला, खांदे पडलेला फेडररला पाहणे हरण्यापेक्षा अधिक क्लेशदायक होते. १५ दिवसांत या कटू आठवणी बाजूला सारत फेडररला लाडक्या विम्बल्डनवर जेतेपदाची मोहोर उमटवायची आहे. ३१ वर्षीय फेडररची ही अखेरची विम्बल्डन स्पर्धा असू शकते. विम्बल्डनच्या झळाळत्या चषकासह अलविदा करण्याच्या फेडररचा मानस असेल.
‘लाल मातीचा राजा’ नदाल ग्रास कोर्टवर तसे वर्चस्व दाखवू शकत नाही. महान खेळाडू होण्यासाठी सर्वसमावेशकता महत्त्वाचा मुद्दा ठरतो. क्ले कोर्टवर वर्चस्व गाजवणाऱ्या नदालला विम्बल्डनचे जेतेपद दोनदाच मिळवता आले आहे. क्ले कोर्टचा बादशाह या उपाधीऐवजी तिन्ही कोर्टाचा स्वामी होणे नदालला जास्त आवडेल. नुकतेच त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी जेतेपद नावावर केले आहे. मात्र तो आता इतिहास झाला आहे. ग्रास कोर्टसाठी आवश्यक डावपेचांच्या बदलांसाठी नदाल तयार होत आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत रोसोल नावाच्या अनुनभवी खेळाडूने नदालला गाशा गुंडाळायला लावला होता. यानंतर गुडघ्याच्या दुखण्याने उचल खाल्ली आणि तब्बल सात महिने नदाल कोर्टपासून दूर होता. या गंभीर दुखापतीतून सावरत नदालने अविश्वसनीय पुनरागमन केले आहे. पण ग्रास कोर्ट परीक्षेचा पेपर नदालसाठी कठीण जातो. क्ले कोर्ट विजयाचा कैफ बाजूला ठेवून हिरवळीवरही अधिराज्य गाजवण्यासाठी नदाल आतुर आहे.
फेडररची शैली आणि नदालकडे असलेली अफाट ऊर्जा या दोन्ही आघाडय़ांवर जोकोव्हिच मागे आहे. मात्र त्याच्याकडे चिवट वृत्ती आहे. चुकांतून शिकत सर्वोत्तम खेळ सादर करण्याची त्याची ओढ विलक्षण आहे. टेनिससारख्या दमवणाऱ्या खेळाला मारक असा दम्याचा आजार जोकोव्हिचला झाला होता. मात्र हार मानणे त्याच्या स्वभावातच नाही. म्हणूनच प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या रॅलीतही तो जिद्दीने खेळतो. हार्ड कोर्टवर त्याचा खेळ बहरतो. विम्बल्डनचे अवघे एक जेतेपद त्याच्या नावावर आहे. ग्रास कोर्टच्या मखमली हिरवळीवरती जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी जोकोव्हिच प्रबळ दावेदार आहे.
या त्रिकुटाची सद्दी मोडण्याचे अवघड काम इंग्लंडच्या अँडी मरेने केले आहे. क्रिकेटमध्ये मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ म्हणून दक्षिण आफ्रिका कुप्रसिद्ध आहे. असेच काहीसे मरेचे झाले होते. उपविजेतेपद, उपांत्य फेरी एवढीच मरेची धाव असे समीकरण झाले होते. मात्र या टीकेमुळे खच्चून न जाता मरेने प्रचंड अभ्यास केला, आपण नेमके कुठे कमी पडतो याकडे लक्ष दिले आणि त्याचा परिणाम दिसून आला. गेल्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम लढतीत फेडररने त्याला नमवले, परंतु महिन्याभरात सगळ्या चुका सुधारत विम्बल्डनच्या कोर्ट्सवरच मरेने ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर फेडररला चीतपट केले. घरच्या मैदानावर, प्रचंड पाठिंब्यात मरे विम्बल्डनचे जेतेपद नावावर करू शकतो.
महिला खेळाडूंमध्ये सेरेना विल्यम्सच्या वर्चस्वामुळे सेरेना आणि इतर अशी थेट वर्गवारी झाली आहे. मारिया शारापोव्हा, लि ना, समंथा स्टोसूर, व्हिक्टोरिया अझारेन्का या प्रत्येकीच्या नावावर ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. पण सेरेनासमोर या सर्वजणी निष्प्रभ ठरतात. अंतिम फेरीपर्यंत चांगला खेळ करणाऱ्या या सगळ्याजणी सेरेनासमोर अक्षरश: समर्पण करतात. यामुळे बहुतांशी वेळा चुरशीच्या, अटीतटीच्या मुकाबल्याऐवजी सेरेनाचे एकतर्फी विजय असा महिलांचा अंतिम सामना होतो. वयापरत्वे सेरेनाचा खेळ आणखी परिपक्व होत चालला आहे. मात्र हे तत्त्व अन्य टेनिसपटूंना लागू होताना दिसत नाही. सेरेनाच्या शक्तीला रोखण्यासाठी बाकी टेनिसपटूंना काहीतरी युक्ती करण्याची वेळ आली आहे. पुरुषांमध्ये जेतेपदासाठी जबरदस्त थरार रंगतो तसा मुकाबला महिला टेनिसमध्येही पाहायला मिळावा ही टेनिसरसिकांची अपेक्षा आहे. या मुकाबल्यातून नवी विजेती मिळाल्यास महिला टेनिससाठी नवी सुरुवात असेल.
भारताला मात्र दुहेरीमध्येच आशा राखता येतील. लिएण्डर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा यांच्या जोडीला एक नवी जोडी ग्रँडस्लॅम पदार्पण करणार आहे. भारतीय टेनिसमधल्या गोंधळाचा सकारात्मक परिणाम म्हणजे दिविज शरण आणि पुरव राजा ही जोडी. यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण प्रदर्शन करत या जोडीने विम्बल्डनच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे, ही भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 7:17 am

Web Title: who will be the king of grass court
टॅग Federer
Next Stories
1 चॅम्पियन्स करंडकः भारताचा इंग्लंडवर पाच धावांनी विजय
2 सचिनच्या मालकीचा ‘मुंबई मास्टर्स’ संघ इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये?
3 सांघिक कामगिरीमुळेच विजय -इशांत
Just Now!
X