मुंबई आणि पुणे ही स्वतंत्र बाणा जपलेली महाराष्ट्रातील दोन शहरे. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व. मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स यांच्या लढतीच्या निमित्ताने शनिवारी हीच ठस्सन क्रिकेटरसिकांना वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. २०१२च्या आयपीएल हंगामापासून सलग ११ सामन्यांतील पराभवाची मालिका सुदैवाने पुण वॉरियर्सने गुरुवारी खंडित केली. २१ एप्रिल २०१२ला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पुण्याने त्याआधी अखेरचा विजय मिळवला होता. दोन पराभवांनंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध मिळविलेला हा विजय त्यांच्यासाठी आत्मविश्वास दुणावणारा ठरणार आहे. पण आता गाठ आहे ती रिकी पाँटिंगच्या मुंबईशी.
दोन वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी चेपॉकवर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सशी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने मिळविलेले दोन विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. सलामीचा रोमहर्षक सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून दोन धावांनी गमावल्यानंतर मुंबईने घेतलेली ही भरारी नक्कीच कौतुकास्पद आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने वानखेडेवर ४८ चेंडूंत ८६ धावांची दिमाखदार खेळी साकारत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या कार्तिकच्या खात्यावर तीन सामन्यांत १८३ धावा जमा आहेत. मुंबईच्या धावफलकावर १ धाव झाली असताना सचिन तेंडुलकर आणि पाँटिंग हे त्यांचे दोन हुकूमी मोहरे तंबूत परतले होते. या कठीण परिस्थितीतून कार्तिकने संघाला तारले. वानखेडेवर गतवर्षी याच दोन संघांत झालेल्या कमी धावसंख्येच्या सामन्यात कार्तिकनेच सर्वाधिक ३२ धावा काढल्या होत्या. रोहित शर्मानेही पहिल्या दोन सामन्यांतील अपयश धुवून काढणारी ७४ धावांची लाजवाब खेळी साकारली. कार्तिक आणि शर्माने तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली. अंबाती रायुडूनेही फक्त ८ चेंडूंत २४ धावा केल्या.
किरॉन पोलार्डने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ५७ धावांची अप्रतिम खेळी उभारली होती, याचप्रमाणे सामन्याला कलाटणी देणारा महेंद्रसिंग धोनीचा सुरेख झेल टिपला होता. त्यानेही दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईला दोनशेचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सचिन आणि पाँटिंगची फलंदाजी ही मुंबईपुढील प्रमुख चिंता आहे. हे दोन्ही फलंदाजी तीन पैकी दोन वेळा धावचीत झाले आहेत. वानखेडेवरील दुसऱ्या सामन्यात हे दिग्गज फलंदाज यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे. लसिथ मलिंगा परतल्यामुळे मुंबईची गोलंदाजीची ताकद अधिक मजबूत झाली आहे. पुणे वॉरियर्सविरुद्धच्या विजयानिशी गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज करण्याचे मुंबईचे मनसुबे आहेत.
मागील सामन्यात दुखापत झालेल्या मार्लन सॅम्युएल्सची अनुपस्थिती पुण्याला जाणवेल. गुरुवारी सलामीवीर रॉबिन उथप्पाने धडाकेबाज ३२ धावा केल्या. त्याला ५३ चेंडूंत ६४ धावा काढणाऱ्या आरोन फिन्चने छान साथ दिली. त्यानंतर युवराज सिंगने नाबाद २८ धावा करीत पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
वानखेडे स्टेडियमवर मागील हंगामात ६ एप्रिलला या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात पुणे वॉरियर्सने मुंबईला फक्त १०१ धावांत रोखून २८ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात अशोक दिंडाने १८ धावांत ४ बळी घेतले होते.

ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज.
आई, तुझा वाढदिवस मी कसा विसरलो! माझा धिक्कार आहे. पण माझा अभिमान वाटेल, अशी खेळी मी कोलकाताविरुद्ध साकारली. त्यानंतर आपल्या दोघांच्या वतीने मी वाढदिवस साजरा केला.