सचिन तेंडुलकरला फ्लेमिंगनं त्रिफळाचीत केलं होतं, तोच व्हिडीयो क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दोघांच्या वाढदिवसाच्या दिवशी ऑफिशियल साईटवर टाकण्यासाठी निवडला. सचिनच्या चाहत्यांना त्यामुळे प्रचंड राग आला आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला शिव्यांची लाखोली वाहिली. परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं असं केलं कारण ते अजूनही सचिनला विसरू शकत नाहीत. सचिनच्या क्रिकेटच्या मैदानावरील आकडेवारीकडे बघितलं की लक्षात येतं ऑस्ट्रेलियाची सल काय आहे ते?

सगळ्यात जास्त शतकं, सगळ्यात जास्त धावा असे अनेक विक्रम नावावर असलेल्या सचिन तेंडुलकरची एक दिवसीय सामन्यातली तसेच कसोटी सामन्यातली कामगिरी बघितली की लक्षात येतं जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज व क्रिकेटचा देव असं बिरूद मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरनं सगळ्यात जास्त चांगली कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळून 51 शतकं, 68 अर्धशतकं व 15,921 धावा फटकावणाऱ्या सचिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 सामन्यांमध्ये सर्वाधिक 11 शतकं, 16 अर्धशतकं व 3,630 धावा अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे.

एकदिवसीय सामन्यांचा विचार केला तर सचिननं 462 सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. त्यातही सर्वाधिक म्हणजे 3077 धावा केल्या आहेत 71 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिननं 49 शतकं व 96 अर्धशतकं झळकावली असून सर्वाधिक 9 शतकं व 15 अर्धशतकं ऑस्ट्रेलियावरोधातच आहेत.

या सगळ्याचा विचार केला तर साहजिकच क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी मैदानावरचा सचिन तेंडुलकर हा सगळ्यात त्रासदायक प्रतिस्पर्धी होता, ज्याला ते आजही विसरू शकत नाहीत. आणि क्रिकेटच्या त्या अनभिषिक्त राजाची विकेट एकच जन्मदिवस असलेल्या फ्लेमिंगनं काढल्याचं निमित्त साधत ही आठवण त्यांनी जागवली आहे.