गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाचा विषय बनलेल्या प्रश्नाचं अखेरीस उत्तर मिळालं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चा सुरु होती. परंतू धोनीने याबद्दल कधीही अधिकृत माहिती दिली नव्हती. सध्या जगभरात करोना विषाणूमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आपल्या सहकाऱ्यांसोबत चेन्नईत IPL ची तयारी करत असलेल्या धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं.

धोनीने अशा पद्धतीने निवृत्ती जाहीर केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या किरकिर्दीतल्या चांगल्या-वाईट क्षणांचा एक व्हिडीओ तयार करुन…मे पल दो पल का शायर हू…या गाण्याच्या बॅकग्राऊंडवर धोनीने आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांपासून मी निवृत्त झालोय असं समजा असं जाहीर केलं. धोनीच्या या अचानक निवृत्तीनंतर सोशल मीडियावर आणि त्याच्या चाहत्यांमध्ये तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं आहे. धोनीने नेमकी आजच निवृत्ती जाहीर का केली आणि काय असू शकतात त्यामागची कारणं?? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये काय सुरु आहे चर्चा…

धोनी आणि रैनाचा दोस्ताना –

धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुरेश रैनानेही पाठोपाठ त्याच्या पावलावर पाऊल टाकत आपणही निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनी आणि सुरेश रैनाचा दोस्ताना हा सर्वांना ठावूक आहे. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने सुरेश रैनाला अनेकदा संधी दिल्या. अनेकदा युवराज सिंहने रैना हा धोनीचा आवडता खेळाडू होता असं उघडपणे बोलूनही दाखवलं आहे. सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक साम्य आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीची सुरुवात शून्यावर आऊट होऊन केली होती. दोन्ही खेळाडू भारताच्या विश्वचषक संघात सहभागी होते आणि आयपीएलमध्येही धोनी-रैना हे एकाच संघाकडून म्हणजेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतात.

गेल्या काही वर्षांपासून सुरेश रैना आणि २०१९ विश्वचषकानंतर धोनी भारतीय संघाबाहेर आहे. प्रत्येक दिवशी भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी तरुण खेळाडूंची सुरु असलेली धडपड आणि प्रदीर्घ काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे दोन्ही खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पुनरागमन हे सोपं मानलं जात नव्हतं. त्यातच करोनामुळे टी-२० विश्वचषकाचं आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे धोनीचेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे दरवाजे बंद व्हायला लागले होते. अशा परिस्थितीत भविष्याचा विचार करत दोन्ही खेळाडूंनी आजच्या दिवशी निवृत्ती जाहीर केली असू शकते.

करोनामुळे बदलेली समीकरणं आणि वाढतं वय –

सर्वोत्तम फिनीशर म्हणून नावारुपाला आलेल्या धोनीच्या बॅटमधून धावांचा ओघ गेल्या काही वर्षांत आटला होता. आपल्या लौकिकाला साजेशी खेळी धोनीकडून होत नाही. एरवी धोनी म्हणलं की सोशल मीडियावर गुणगान गाणारे त्याचे चाहतेही आता त्याच्या फॉर्मबद्दल कुजबुजत का होईना चर्चा करत होते. २०१९ विश्वचषकानंतर धोनी सुमारे वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यात नवीन वर्षात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या नियमांत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नियमांचा धोनीशी थेट संबंध नसला तरीही येत्या काही काळात भारतीय संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार नाहीये. डिसेंबर महिन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. परंतू या दौऱ्यातही भारत पहिले ४ कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर नवीन वर्षातही मर्यादीत षटकांच्या मालिकेच्या आयोजनाबद्दल साशंकता आहे.

२०२१ टी-२० विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे असलं तरीही तोपर्यंत धोनी वयाच्या चाळीशीत पोहचलेला असणार आहे. त्यामुळे तोपर्यंत धोनी आपल्या जुन्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकेल का याबद्दल शंका आहे. याउलट पुढील काही वर्ष आयपीएल खेळत राहण्याचा विचार धोनीने याआधी बोलून दाखवला आहे. अशा परिस्थितीत आयपीएल सरावासाठी पोहचलेल्या धोनीने आपल्या कारकिर्दीची अखेर केली असू शकते.

२०१९ विश्वचषकातली ती आठवण

२०१९ विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळत असताना धोनी गप्टीलच्या अचूक फेकीवर धावबाद झाला. या पराभवानंतर भारतीय संघाचं आव्हान स्पर्धेतून संपलं. संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांच्या दरम्यानच सामना संपला होता. त्यामुळे ती दुर्देवी आठवणीला अखेरचा अलविदा करण्यासाठी धोनीने आज संध्याकाळची वेळ निवडली असावी अशीची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

 

याचसोबत रेल्वे आणि लष्कर दल अशा दोन प्रमुख विभागांमध्ये धोनीने काम केलं आहे. धोनीच्या देशभक्तीबद्दल अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत. २०१९ विश्वचषकानंतर दोन महिन्यांसाठी धोनीने लष्करात कामही केलं होतं. त्यामुळे आपल्या निवृत्तीची घोषणा करताना स्वातंत्र्य दिनापेक्षा दुसरा चांगला दिवस धोनीसाठी मिळू शकला नसता. म्हणूनही धोनीने आज निवृत्ती जाहीर केली असेल असा अंदाज आहे.

पल दो पल का शायर…

निवृत्तीची घोषणा करताना तयार केलेल्या व्हिडीओत धोनीने आपल्या कारकिर्दीतल्या चांगल्या-वाईट अशा सर्व घटना नमूद केल्या आहेत. धोनी हा जुन्या हिंदी गाण्यांचा चाहता आहे. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात धोनीचा फलंदाजीतला फॉर्म उतरला असला तरीही त्याचं यष्टीरक्षण हे वाखणण्याजोगं होतं. त्याला संघातून वगळण्यात आल्यानंतर ऋषभ पंतला त्याच्या तोडीची कामगिरी करता येत नाहीये. त्यामुळे अनेकदा चाहत्यांनी धोनीला संघात संधी देण्याची मागणी केली होती. पण आपल्या आवडत्या गाण्याच्या माध्यमातून धोनीने आपल्या चाहत्यांना भारतीय संघाला आता माझ्याशिवाय खेळावं लागेल असा संदेश दिला असेल. तसेच गाण्याच्या ओळीप्रमाणे मी कोणाच्याही मध्ये येणार नाही असं सांगायचाही धोनीचा प्रयत्न असेल.

निवृत्ती जाहीर करण्यासाठी धोनीने साधलेली वेळ आणि दिवस याबद्दल सोशल मीडियावर अशा एक ना अनेक चर्चा सुरु आहेत. पण सात वाजून २९ मिनीटं या वेळेमागचं नेमकं गणित काय असेल हे धोनीकडून कळेल असा चाहत्यांमध्ये विश्वास आहे.