भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, काही दिवसांपूर्वी भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. इंजिनीअर यांनी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीवर टीका केली होती. विश्वचषकात अनुष्का शर्माला चहा देण्याव्यतिरीक्त यांनी काय काम केलं?? अशा आशयाची टीका करत इंजिनीअर यांनी केली होती.

“तुम्हाला निवड समितीबद्दल काही टीका करायची आहे तर जरुर करा, पण अनुष्काचं नाव घेण्यात काय अर्थ आहे?? ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्यामुळे तिचं नाव घेतलं की आपण चर्चेत येतो म्हणूनच असे प्रकार केले जातात.” एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना विराटने अनुष्कावरील टीकेला उत्तर दिलं.

“विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धचा सामना पाहण्यासाठी ती आली होती. परिवारासाठी आणि निवड समितीसाठी बसण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली होती. ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत सामना पाहण्यासाठी आलेली होती. मात्र प्रसिद्ध व्यक्तींवर टीका केली की प्रसारमाध्यमांमध्ये नाव चर्चेला येतं म्हणून असे प्रसंग घडतात”, विराटने आपलं मत मांडलं.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघांने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत बाजी मारली. यानंतर भारतीय संघासमोर वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे, ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे, या मालिकेत दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.