क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ४१ व्या सामन्यामध्ये यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी मात केली. या एकतर्फी विजयासहीत इंग्लंडने उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे. मात्र इंग्लंडच्या या विजयामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे पाकिस्तान संघाचे स्वप्न जवळजवळ भंग पावले आहे. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. शुक्रवारी पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. मात्र या सामन्यामध्ये पाकिस्तानने नाणेफेक हरला आणि बांगलादेशने फलंदाजी घेतली तर पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेबाहेर जाईल. कारण पाकिस्तानने आधी गोलंदाजी केली तर त्यांना बांगलादेशने दिलेले धावांचे लक्ष्य शून्य चेंडूत पूर्ण करावं लागेल. ही गोष्ट अशक्य असल्याने नाणेफेक बांगलादेशने जिंकून फलंदाजी घेतली तर सामना जिंकूनही पाकिस्तान विश्वचषकाबाहेरच जाईल. जाणून घेऊयात उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्यासाठी पाकिस्तानला काय करावे लागेल…

बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी घेतल्यास पाकिस्तान बाहेर

लॉर्डसच्या मैदानावर शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना रंगणार आहेत. या सामन्यामध्ये पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याचीच शक्यता अधिक आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद नाणेफेक हरला आणि बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला तर पाकिस्तानचा संघ थेट स्पर्धेबाहेर जाईल.

उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी पाकिस्तानसमोर एक मार्ग आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करुन ३५० धावा केल्या तर त्यांना बांगालादेशचा संपूर्ण संघ ३८ धावांवर बाद करावा लागेल. तसेच जर पाकिस्तानने ४०० धावा केल्या तर त्यांना बांगलादेशला ८४ धावांवर बाद करावे लागेल. सध्या बांगलादेश संघाची कामगिरी पाहता या दोन्ही गोष्टी पाकिस्तान संघासाठी जवळजवळ अशक्य आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील तीन संघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच बांगलादेशला हरवून भारताने उपांत्या फेरीचे तिकीट पक्का केल्यानंतर काल इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडचा पराभव करुन इंग्लंड उपांत्य फेरीत जाणारा तिसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये त्यांनी मागेच टाकले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चौथा संघ न्यूझीलंडच असणार आहे. मात्र पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चमत्कार घडवलाच तर ते उपांत्य फेरीत दाखल होती. मात्र या चमत्काराची स्वत: पाकिस्तानलाही अपेक्षा नसल्याचे पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सांगितले आहे. त्यामुळे आता उद्याच्या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील चौथ्या संघाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.