आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. पावसामुळे पहिल्या सत्राचा वेळ वाया गेला असला, तरी चाहते अजूनही या सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारताने काल आपल्या अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर केली. मात्र, न्यूझीलंडने अजूनही आपले ११ खेळाडू कोण असणार हे सांगितलेले नाही. न्यूझीलंडच्या या रणनितीमागे काय आहे, हे आता उघड झाले आहे.

संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी अंतिम ११ खेळाडूंची घोषणा का झाली नाही, हे सांगितले आहे. यामागे त्यांनी एक मोठे कारण दिले आहे. खेळपट्टी पाहिल्यानंतरच आम्ही तो प्लेइंग इलेव्हनची घोषणा करणार आहोत, असे  स्टिड यांनी सांगितले.

 

हेही वाचा – खुलासा..१०-१५ रुपयांसाठी शफाली वर्मा ठोकायची चौकार-षटकार!

स्टिड म्हणाले, “हे आश्चर्यकारक आहे, की बर्‍याच भारतीयांना न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन जाणून घ्यायची इच्छा आहे. खेळपट्टी दिसत नाही, तोपर्यंत आम्ही ते जाहीर करणार नाही. जर खेळपट्टी हिरवी असेल, तर वेगवान गोलंदाजांना खेळवणार. जर खेळपट्टी मातेरी असेल, तर फिरकी गोलंदाज आणि मध्यम गतीच्या गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करू. आम्ही तीन दिवसांपासून खेळपट्टी पहात आहोत आणि ती हिरवी होत चालली आहे. त्यावरील गवत काढले होते, परंतु ती अद्याप हिरवी आहे. याक्षणी गोलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी आहे, जर आम्ही नाणेफेक जिंकली, तर आम्ही प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देऊ.”

भारताचे अंतिम ११ खेळाडू –

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.