पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चांगली सुरुवात केली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या शान मसूदला जेम्स अँडरसनने पायचीत पकडत माघारी धाडलं. यानंतर आबीद अली आणि कर्णधार अझर अली यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अझर अली माघारी परतल्यानंतर पाकिस्तानचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. पहिल्या दिवसाअखेरीस पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी परतला होता. स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या दिवशी असाद शफीकचा बळी घेतला. मात्र गोलंदाजीदरम्यान ब्रॉडला त्रास जाणवायला लागल्यामुळे त्याने आपला इनहेलर मागवला. याआधी ब्रॉडला कधीही इनहेलर वापरताना चाहत्यांनी पाहिलं नव्हतं. त्यामुळे ब्रॉडला अचानक मैदानात इनहेलरचा वापर करताना पाहून चाहतेही आश्चर्यचकीत झाले.

स्टुअर्ड ब्रॉडला दम्याचा आजार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्टुअर्टचं एक फुफ्फुस अर्ध काम करतं…यासाठी डॉक्टरांनी त्याला इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रॉडने ही गोष्ट अनेक वर्ष कोणालाही सांगितली नव्हती. २०१५ साली त्याने आपल्या सहकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. तरीही ब्रॉडने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कसोटीत ५०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.

“माझी प्रिमॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे. सातव्या महिन्यातच माझा जन्म झाला. जन्माच्यावेळी माझं एक फुफ्फुस पूर्णपणे विकसीत झालेलं नव्हतं. माझी खात्री घ्यायला डॉक्टर तयार नव्हते. त्यामुळे मला लहानपणापासून दम्याचा आजार होता आणि यासाठी मी इनहेलर वापरतो. पण एक खेळाडू म्हणून मला कधीही या गोष्टीचा त्रास जाणवला नाही. किंबहुना मी अशा परिस्थितीतही इतकी वर्ष खेळतोय याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं.” Daily Mail ला दिलेल्या मुलाखतीत ब्रॉड बोलत होता.