‘‘मी केलेली टीका किंवा दिलेल्या सूचनांचा नकारात्मक विचार होऊ नये. यामध्ये माझे वैयक्तिक आक्षेप नाहीत, असे मत आजीवन बंदीची शिफारस करण्यात आलेली बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने व्यक्त केले. मी करत असलेल्या टीकेमुळे आजीवन बंदीच्या शिक्षेची शिफारस मूर्खपणाचे ठरेल,’’ असेही तिने पुढे सांगितले.
टीका करण्यात चूक काय आहे? आपली मते व्यक्त केली म्हणून आजीवन बंदी? हे खरंच मूर्खपणाचे आहे. हे कसे असू शकते. मी शब्दांमध्ये अडकत नाहीये. मी खोटे बोलणार नाही, अशा शब्दांत ज्वालाने आपल्यावरील आजीवन बंदीच्या शिफारशीच्या निर्णयावर टीका केली.
बॅडमिंटन हा माझा खेळ आहे. या खेळाला उंचावर नेणे हे माझे काम आहे. मी दिवसातील आठ तास या खेळासाठी देते. आयुष्यात बॅडमिंटन खेळणे हेच माझे सर्वस्व आहे. दुसरं काहीच नाही. दुसरं काय असू शकतं? राजकारण कसं खेळावे हे मला माहीत नाही. मी काही गोष्टींबाबत मुत्सद्दी असू शकत नाही. संघटनेतल्या काही लोकांविरुद्ध मी भूमिका मांडते आहे असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे असेल. बॅडमिंटन हेच माझे आयुष्य आहे, दुसऱ्या गोष्टींसाठी मला वेळ नाही.