सेंट लुसिया येथे झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला १६ धावांनी धूळ चारली. या सामन्यासह विंडीजने मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीतच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही जोरदार कामगिरी केली. या सामन्यात वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू फॅबियन एलनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचचा जबरदस्त झेल घेतला.

फिंचने हेडन वॉल्शच्या फुलटॉस चेंडूवर उंच फटका खेळला. हा चेंडू चौकार जाईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, एलनने चपळाईने धाव घेत एकहाती झेल घेतला. फिंचलाही थोडा वेळ हा झेल एलनने नीट पकडला आहे, की नाही हे समजले नाही. मात्र कॅरेबिन खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करताच फिंचने बाहेरचा रस्ता धरला. त्याने २३ चेंडूत ३४ धावा केल्या.

 

हेही वाचा – IND vs SL 1st ODI : कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

या मालिकेच्या तिसर्‍या टी-२० मध्ये एलनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचा असाच झेल पकडला होता. त्यावेळीही हेडन वॉल्श गोलंदाजी करत होता. फिंचला वॉल्शच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता, पण त्याने मारलेला चेंडू बॅटच्या तळाशी लागला. विंडीजच्या ड्वेन ब्राव्होने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण हातातून सुटलेला चेंडू त्याने पायाला उडवला. बाजूला असलेल्या एलनने शिताफीने तो झेल टिपला.

असा रंगला शेवटचा सामना

पाचव्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने २० षटकांत ८ गडी गमावून १९९ धावा केल्या. यजमानांकडून इव्हिन लुईसने सर्वाधिक १९९ धावा केल्या. लुईसने या खेळीत ४ चौकार आणि ९ षटकार लगावले. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ९ गडी गमावून १८३ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार आरोन फिंचने सर्वाधिक ३४ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल आणि शेल्डन कॉट्रेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.