भारतीय महिला संघाची वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय महिला संघाला एका धावेने पराभव स्विकारावा लागला आहे. विंडीजने भारतीय महिलांना विजयासाठी २२६ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय महिला प्रत्युत्तरादाखल २२४ धावांपर्यंत मजल मारु शकला.

विंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करताना आश्वासक सुरुवात केली होती. नताना मॅक्लेनचं अर्धशतक आणि कर्णधार स्टेफनी टेलरच्या आक्रमक ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजने भारतीय गोलंदाजांना चांगलंच नाकीनऊ आणलं. मधल्या फळीत विंडीजच्या चेडन नेशननेही ४३ धावा पटकावत विंडीजला २०० धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून शिखा पांडे आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना झुलन गोस्वामी, एकता बिश्त आणि पुनम यादवने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. प्रिया पुनिया आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. प्रिया पुनियाने ७५ तर जेमायमाने ४१ धावा केल्या. पुनम राऊत आणि मिताली राजनेही त्यांना चांगली साथ दिली. मात्र या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. मोक्याच्या क्षणी एकामागोमाग एक विकेट फेकत भारतीय महिलांनी विंडीजच्या संघाला सामना बहाल केला. विंडीजकडून अनिसा मोहम्मदने ५ तर स्टेफनी टेलर आणि शबिका गजनबी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.